– तीन जलदगतील गोलंदाज, दोन अष्टपैलू आणि यष्टीरक्षकाची निवड
– स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघात नवोदित फिरकीपटू मिशेल स्वेप्सन याचा समावेश
मेलबर्न – भारताविरुद्धच्या खडतर दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाने 16 सदस्यीय संघाची रविवारी निवड केली. ऑस्ट्रेलिया संघात करताना फिरकीपटूंना संधी दिली आहे. या संघात सहा फलंदाज, चार फिरकीपटू, तीन जलदगतील गोलंदाज, दोन अष्टपैलू आणि यष्टीरक्षकाची निवड झाली आहे. फिरकीपटूंना मदत करणाऱ्या खेळपट्ट्या ही भारतातील खेळपट्ट्यांची ओळख असल्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ही संघनिवड केली आहे. गेल्या चार सामन्यांमध्ये विजय मिळविणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतात कडव्या लढतीला सामोरे जावे लागणार आहे.
मॅक्सवेलचा दोन वर्षांनी समावेश
स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघात नवोदित फिरकीपटू मिशेल स्वेप्सन याचा समावेश करण्यात आला आहे. तर, ग्लेन मॅक्सवेलचा दोन वर्षांनी पुन्हा कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 2004 पासून अद्याप एकही कसोटी सामना भारतात जिंकू शकलेला नाही. सामन्याच्या ठिकाणी खेळपट्ट्या कशा मिळतील, हे सांगणे आता कठीण आहे. त्यामुळे जास्तीतजास्त पर्याय उपलब्ध असावेत यादृष्टीने संघनिवड करण्यात आली आहे.
चांगल्या कामगिरीवरच निवड
खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीवरच त्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये उपखंडातील कामगिरीचाही विचार करण्यात आला आहे. युवा खेळाडू अनुभवी खेळाडूंकडून प्रेरणा घेतील अशी आशा आहे. नॅथन लिऑन, ऍश्टन ऍगर व स्टिव्ह ओकीफ यांच्यासह 23 वर्षीय स्वेप्सन हा फिरकीपटू असणार आहे. मॅक्सवेल, मार्श या अष्टपैलू खेळाडूंबरोबर हिल्टन कार्टराईट हाही संघात असेल, असे मुख्य निवडकर्ते ट्रेवर होन्स यांनी सांगितले.
संघ पुढीलप्रमाणे – स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ऍश्टर ऍगर, जॅक्सन बर्ड, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लिऑन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह ओकीफ, मॅथ्यू रेन्शॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन, मॅथ्यू वेड.
कसोटी मालिका वेळापत्रक –
पहिली कसोटी – पुणे (23 ते 27 फेब्रुवारी)
दुसरी कसोटी – बंगळूर (4 ते 8 मार्च)
तिसरी कसोटी – रांची (16 ते 20 मार्च)
चौथी कसोटी – धर्मशाळा (25 ते 29 मार्च)