सामाजिक बांधीलकीतून मुंबईकर धावले

0

मुंबई । नेहमी धावपळ करणार्‍या मुंबईकरांची रविवारची पहाट काहीशी वेगळी होती. आजही मुंबईकरांना धावायचे होते. पण ही धाव होती सामाजिक बांधीलकी जोपासणारी. बोचर्‍या थंडीत रविवारच्या या प्रसन्न पाहटेत 14 व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये मुंबईकर मोठ्या संख्येने सहभागी झाले. यात टान्झानियाने बाजी मारली. 42 किलोमीटरची पुरुष गटाची मुख्य मॅरेथॉन टान्झानियाच्या अल्फोन्स सिंबूने जिंकली. तर मुख्य मॅरेथॉन परभणीतील ज्योती गवते हिने भारतीय महिलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. भारतीय गटात खेता राम यांनी अव्वल क्रमांक पटकाविला.

रविवारी पहाटे साडेचारला 14 व्या मुंबई मॅरेथॉनची दिमाखात सुरुवात झाली. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी मुख्य मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धकांची धावपळ सुरू झाली. यावेळी महादेव जानकर, शायना एनसी उपस्थित होते. सीएसटीहून वांद्रेपर्यंतची 42 किमीच्या हौशी मॅरेथॉन तर वरळी डेअरी येथून अर्ध मॅरेथॉन आणि पोलीस चषक मॅरेथॉनला सुरुवात झाली. कडाक्याच्या थंडीतही मुंबईकरांनी या मॅरेथॉनला भरभरून प्रतिसाद दिला. यावेळी मुख्यमंत्री देवे्ंरद फडणवीस, अमृता फडणवीस यांच्यासह अनेक हिंदी, मराठी सिनेजगतातील अनेक सेलिब्रिटी हजर होते.

अर्ध मॅरेथॉन आणि हौशी धावपटूंच्या मॅरेथॉनमध्ये देशविदेशातील धावपटू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अर्ध मॅरेथॉनच्या पुरुष गटात जी. लक्ष्मण यांनी बाजी मारली, तर सचिन पाटील यांनी दुसरा आणि दीपक कुंभार यांनी तिसरा क्रमांक पटकावला.

ड्रीम रनमध्ये रस्ता सुरक्षेचा संदेश

दरवर्षीची मॅरेथॉन ही मुंबईकरांसह सहभागी सर्वच देशविदेशातील स्पर्धकांना सामाजिक संदेश देऊन त्यासाठी धावायला लावते. यंदाच्या ड्रीम रनमध्ये रस्ता सुरक्षेचा संदेश देण्यात आला. अनेकांचा रस्ता अपघातात मृत्यू होतो. त्यामुळे सुरक्षित गाडी चालवणे आणि सुरक्षित प्रवास करणे किती गरजेचे आहे, याबाबतची जनजागृती यावेळी विविध फलकांच्या माध्यमातून करण्यात आली.

प्रेरणादायी धाव

दिव्यांगांनही दरवर्षीप्रमाणे यंदाच्या मॅरेथॉनमध्ये उत्स्फूर्त भाग घेतला. रविवारी सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनी दिव्यांगांच्या मॅरेथॉनला सुरुवात झाली. सीएसटीपासून सुरू झालेली दिव्यांगांची मॅरेथॉन मेट्रो सिनेमाजवळ संपली. या मॅरेथॉनसाठी 2.4 किलोमीटर इतके अंतर ठेवण्यात आले होते. दिव्यांगांची धाव अनेकांसाठी प्रेरणा देणारी ठरली.

अनेक पावलांना आधार

2004 मध्ये ‘रन फॉर अ कॉज’ असे मिशन घेऊन मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली. जगभरातील सर्वोच्च दहा मॅरेथॉनमध्ये मुंबई मॅरेथॉनलाही स्थान मिळाले आहे, ही मुंबईकरांसाठी अभिमानाची बाब आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणारी अनेक पावले ही सुदृढ आरोग्याचा संदेश देत सामाजिक बांधीलकी जोपासण्याचे भानही प्रत्येक पावलागणिक जागवत असतात. या मॅरेथॉनमधून जमा झालेला निधी हा शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, गरिबांना, दिव्यांगांना मदत, विविध खेळांना पाठिंबा यासाठी खर्च केला जातो. गेल्या 13 वर्षांत 162 कोटी 62 लाखांचा निधी मुंबई मॅरेथॉनने विविध समाजोपयोगी कार्यासाठी उभा केला आहे. सामाजिक बांधीलकी जोपासणारी ही धाव आर्थिक समस्येअभावी अनेकांच्या अडखळणार्‍या पावलांना मजबूत करून त्यायंच उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी उपयोगी पडत असून मुंबईकरांमध्येही सामाजिक बांधीलकीचे भान जागवत आहे.