375 कोटींची नुकसान भरपाई 50 हजार फळ पिक विमा धारकांना मिळणार : खासदार रक्षा खडसे 

50 thousand fruit crop insurance holders will get compensation of 375 crores : MP Raksha Khadse मुक्ताईनगर : हवामानावर आधारीत फळपीक विमा योजनेंतर्गत फळ पीक विमा उतरविलेल्या जिल्ह्यातील 50 हजारांहून अधिक शेतकर्‍यांना जास्त तापमानामुळे तसेच वादळामुळे नुकसान झाल्याबद्दल प्रति हेक्टरी जवळजवळ 61 हजार 500 ते 70 हजारांपर्यंत नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

बँक खात्यात भरपाई होणार वर्ग
मे महिन्यामध्ये अति तापमान तसेच कमी तापमान व जून महिन्यात वादळामुळे केळीचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा विमा कंपनीद्वारे व महसूल विभागामार्फत पंचनामा केल्यानंतर जिल्ह्यातील सर्व 86 महसूल मंडळे नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात आली. काही मंडळांना कमी व जास्त तापमान व वादळामुळे झालेल्या नुकसान अंतर्गत प्रति हेक्टर 70 हजार रुपये तर काही महसूल मंडळांना 61 हजार 500 व 26 हजार 500 अशी नुकसान भरपाई मिळणार आहे. गेल्या वर्षी सदर पीक विमा अंतर्गत फक्त 3 महसूल मंडळांना नुकसान भरपाईसाठी पात्र ठरविण्यात येऊन केवळ 11 हजार शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली होती, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी होती परंतु यावर्षी सर्व महसूल मंडळे नुकसानीसाठी पात्र ठरल्यामुळे जवळजवळ सर्व शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकर्‍यांना थोडाफार हातभार लागणार आहे. येत्या आठ-दहा दिवसात सदर नुकसान भरपाई ही शेतकर्‍यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार खडसे यांनी दिली.