क्रिकेट खेळली नसती तर स्मृती शेफ असती

0

नवी दिल्ली । भावाला क्रिकेट खेळताना पाहून हळूहळू हातात बॅट पकडणार्‍या स्मृती मंधानाने इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत चांगलीच छाप पाडली आहे. तिला संघात घ्यायचे की नाही यावर निवड समितीत बराच खल झाला होता. पण स्मृतीने धावांचा रतीब टाकत सगळ्यांचीच बोलती बंद केली. मूळ सांगलीकर असलेल्या स्मृतीला क्रिकेट खेळण्यास खरे प्रोत्साहन दिले तिचे वडील श्रीनिवास यांनी. आता महिला क्रिकेटमधील वीरेंद्र सेहवाग अशी बिरुदावली मिळालेल्या स्मृतीला रिकाम्या वेळेत स्वयंपाक करायला आवडते. क्रिकेटपटू झाली नसती स्मृती चांगली शेफ झाली असती असा उलगडा श्रीनिवासन यांनी केला आहे. क्रिकेटमुळे स्मृतीला कुटुंबीयांसाठी फारसा वेळ देता येत नाही. पण ती जेव्हा घरी असते त्यावेळी स्वत: स्वयंपाक करून आम्हाला खाऊ घालते. तिच्या हाताला चव असल्याचे वडील म्हणाले.

यशस्वी पुनरागमन
डाव्या गुडघ्यातील स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे स्मृतीला सहा महिने स्पर्धात्मक सरावापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे आयसीसी विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात तिला स्थान मिळाल्यानंतर अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला होता. त्यातही तिला सलामीला खेळवण्याचा निर्णय अनपेक्षित मानला जात होता. मात्र, सांगलीच्या या 20 वर्षीय खेळाडूने येथील स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध तडाखेबाज 90 धावा, तर वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 106 धावा करीत आपली निवड सार्थ ठरवली आहे.दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर येथील यशस्वी पुनरागमनामुळे मला खूप आनंद झाला आहे.

डावखुरे हे शैलीदार असतात
बी. काँमची विद्यार्थिनी असलेली स्मृती डावखुरी फलंदाज आहे. पण फलंदाजी सोडली तर बाकी सर्व कामे ती उजव्या हाताने करते. विशेष म्हणजे ज्याला क्रिकेट खेळताना पाहून स्मृतीने क्रिकेटचे धडे गिरवले तो भाऊही डावखुरा फलंदाज आहे. डावखुरे फलंदाज शैलीदार असतात म्हणून श्रीनिवास यांनी आपल्या मुलांना डावखुरे फलंदाज केल्याचे सांगितले.

कामगिरीत सातत्य राखणार
प्रत्यक्ष स्पर्धेतील खणखणीत कामगिरीनंतर आता उर्वरित सामन्यांमध्येही तशीच चमक दाखवण्याचा प्रयत्न आहे,असे स्मृतीने सांगितले. 2014मध्ये स्मृतीने इंग्लंडविरुद्ध इंग्लंडमधील मैदानावरच खेळताना भारतीय संघाला कसोटी विजय मिळवण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.