खराब कामगिरीमुळे मुख्यमंत्र्यांनी फटकारले
मुंबई : सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या 23 पैकी निम्म्या म्हणजे 11 खासदारांची कामगिरी फारशी समाधानकारक नसल्याची धक्कादायक बाब भाजपच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून चव्हाट्यावर आली आहे. या शिवाय, 122 पैकी 39 आमदारांची कामगिरीदेखील अजिबात चांगले नसून, त्यांचे राजकीय भवितव्य धोक्यात आले आहे. या आमदारांना कामगिरी सुधारण्याची तंबीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून, कामगिरी सुधारा अन्यथा फळे भोगा, या शब्दांत फडणवीस यांनी संबंधित आमदारांना फटकारल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. भाजपच्या आमदार व खासदारांनी भ्रष्टाचारापासून दूर रहावे, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या सर्वेक्षणावर रणनीती ठरविण्यासाठी भाजपची एक महत्वपूर्ण बैठकही मुंबईत झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी आमदार आणि खासदारांना त्यांचे भवितव्य धोक्यात असल्याचा स्पष्ट संकेत दिले आहेत. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांचा 500 कोटींचा एसआरए घोटाळा, अन्न व औषधी मंत्री गिरीश बापट यांच्यावर झालेले डाळ घोटाळ्याचे आरोप, माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेला भूखंड घोटाळ्याचा आरोप, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोलेच्या कन्येचा शिष्यवृत्ती लाभाचे प्रकरण आदी घोटाळ्यांमुळे राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. प्रकाश मेहता यांची सद्या लोकायुक्तांमार्फत चौकशी सुरु आहे. त्यामुळे सरकारची प्रतिमा सावरण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंबर कसली असल्याचेही राजकीय सूत्राने सांगितले.
खराब कामगिरीचे फळ भोगावे लागेल!
भारतीय जनता पक्षाने आमदारांच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते. पक्षाच्या 122 पैकी 39 आमदारांची कामगिरी फारशी चांगली नसल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले. याशिवाय 23 पैकी 11 खासदारांनादेखील चांगले काम करण्यात अपयश आल्याचे सर्वेक्षण अहवाल सांगतो. याच सर्वेक्षणाचा आधार घेत मुख्यमंत्र्यांनी स्वपक्षीय आमदारांना चांगलेच फैलावर घेतले. 39 आमदार आणि 11 खासदारांच्या उमेदवारीला मोठा विरोध होणार आहे. त्यामुळे या आमदार, खासदारांना प्रचंड मेहनत घेत कामगिरीत सुधारणा करावी लागेल, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला. भ्रष्टाचारामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि सरकारने उत्तरदायी असायला हवे. जनतेला उत्तरदायी असलेले प्रशासन चालवणे ही माझी जबाबदारी आहे, अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आमदारांना खडसावले. स्वच्छ आणि पारदर्शक प्रशासनात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नियुक्त्त्या आणि बदल्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार, राजकीय हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. आमदार आणि खासदारांना कामगिरी सुधारावी लागेल. अन्यथा परिस्थिती अवघड होईल आणि खराब कामगिरीचे फळ भोगावे लागेल, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींची कानउघाडणी केली.
प्रत्येक आमदार-खासदाराचे रिपोर्टकार्ड बनविणार
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मागील महिन्यात मुंबईला भेट दिली होती. शहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी आमदारांची बैठक घेतली. शहा यांनी लोकसभेसाठी देशात 350, तर विधानसभेत 200 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी डोळ्यासमोर ठेवून बूथस्तरावर समिती स्थापन करावी, असे आदेश शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना दिले होते. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार 122 पैकी 39 आमदार, तर 23 पैकी 11 खासदारांचे भवितव्य धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मालिन होत असल्याने भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर कुठलीही तडजोड करणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी खडसावले. प्रत्येक आमदार-खासदाराचे रिपोर्ट कार्ड बनवून कामाचा अहवाल घेतला जाणार आहे. काम न करणार्या लोकप्रतिनिधींना येत्या 2019 च्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. आमदार-खासदारांना स्वतःच्या मतदारसंघासोबतच 2014 च्या निवडणुकीत, भाजप पराभूत झालेल्या मतदारसंघातही लक्ष घालण्याची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या निवडणुकीसाठी भाजपची स्वबळावर लढण्यासाठी जोरदार हालचाली आतापासूनच सुरु करण्यात आल्या आहेत.