39 भारतीय मारले गेले!

0

केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांची संसदेत माहिती

नवी दिल्ली : इसिस या या दहशतवादी संघटनेने अपहरण केलेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली. तीन वर्षांपूर्वी मोसूलमधून या भारतीयांचे अपहरण झाले होते. यामधील अनेकजण पंजाबमधील होते. इसिसने 2014 मध्ये मोसूलचा ताबा घेतल्यानंतर या सर्व भारतीयांचे अपहरण करुन ओलिस ठेवले होते. भारतीय मोसूलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच, त्यांचे अपहरण केले गेले होते. दरम्यान, 40 अपहृत भारतीयांपैकी सुखरूप परतलेल्या हरजीत मसीह याच्या खुलाशाने केंद्र सरकार अडचणीत आले आहे. हरजीतने 39 नागरिकांची इसिसने फारपूर्वीच हत्या केल्याचे सरकारला सांगितले होते, असा दावा केला आहे. सरकारने 39 जणांच्या कुटुंबीयांची दिशाभूल केली असेही त्याने म्हटले आहे. दरम्यान, इतके दिवस ही माहिती लपवून ठेवून सरकार देशवासीयांचा विश्वासघात केला, अशी घणाघाती टीका विरोधकांनी केली आहे.

भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणणार
इराकमधील मोसूल भागातून जून 2014मध्ये इसिस या दहशतवादी संघटनेने 40 भारतीयांचे अपहरण केले होते. या 40 जणांपैकी हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या 39 भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यावेळी परराष्ट्रमंत्र्यांनी भारतीयांना इराकमधील कारागृहात बंद केले असल्याची शक्यता वर्तविली होती. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनीच दिली आहे. मृतांमधील 31 जण पंजाब, चौघे हिमाचल आणि बाकीचे बिहारमधील आहेत. सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीप्रमाणे, सोमवारी त्यांना 38 भारतीयाचे डीएनए सॅम्पल जुळले आहेत. तसेच 39 व्या भारतीयाचे डीएनए 70 टक्के जुळले आहे. यासोबत सर्व भारतीयांचे मृतदेह लवकरात लवकर भारतात आणले जातील, असेही त्यांनी सांगितले. स्वराज यांनी सांगितले की, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे इराकला जाणार आहेत आणि सर्व भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणतील. इराकहून मृतदेह घेऊन उड्डाण करणारे विमान सर्वात आधी अमृतसरला, त्यानंतर पाटणा आणि नंतर कोलकाताला जाईल.

सरकारने कुटुंबीयांची दिशाभूल केली
39 बेपत्ता भारतीय नागरिक जीवंत असल्याचा समज अगदी गेल्या वर्षीपर्यंत भारत आणि इराकचा होता. परंतु त्यांना फार पूर्वीच ठार करण्यात आले होते, मी याची माहिती सरकारला दिली पण त्यांनी 39 जणांच्या कुटुंबीयांची दिशाभूल केली असा दावा मोसूलमधून पळालेल्या हरजीत मसीहने केला आहे. 40 जणांपैकी एकटा हरजीत मसीह सुखरुप परतला होता. दरम्यान, हरजीतने याआधी आपल्या पायाला गोळी लागल्याचा दावाही केला होता. हरजीत खोटे नाव धारण करून काही बांगलादेशी नागरिकांसमवेत मोसूलमधून पळून जाण्यास यशस्वी झाला होता. पण आपण तिथून कसा पळ काढला हे मात्र सांगायला तो तयार नसल्याचे सुषमा स्वराज राज्यसभेत म्हणाल्या. याप्रकरणी सुषमा स्वराज लोकसभेत निवेदन देत असताना विरोधकांनी गदारोळ घातला. विरोधकांनी गदारोळ घातल्याने स्वराज निवदेन देऊ शकल्या नाहीत. स्वराज यांनी संताप व्यक्त केला असून, हे अत्यंत दुर्देवी आहे, काँग्रेस मृतांचे राजकारण करत आहे असे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी घटनेची सविस्तर माहिती देत काँग्रेसवर टीका केली.