पॅरिस । राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कट्टर उजव्या विचारसरणीच्या उमेदवार मरीन ली पेन यांना नाकारत फ्रान्सच्या जनतेने इमॅन्युएल मॅक्रॉन यांना आपले नवे राष्ट्राध्यक्ष निवडले आहे. 39 वर्षीय मॅक्रॉन फ्रान्सच्या इतिहासातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. त्यांनी मेरी ले पेन यांच्यावर विजय मिळवला. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचाच विजय होणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यानुसार त्यांनी 80 लाख 50 हजार 245 मते म्हणजे एकूण मतांच्या 61.3 मते मिळवत राष्ट्रपतीपदाची शर्यत जिंकली.
मतदानासाठी मतपत्रिका
मतपत्रिकांच्या माध्यमातून झालेल्या या मतदानात मॅक्रॉन यांना तब्बल 65.5 टक्के मते मिळाली आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिल्यानंतर त्यांच्या पक्षाचे उमेदवार पहिल्या फेरीतच बाद झाले. युरोपातील जर्मनीनंतरची दुसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या फ्रान्समध्ये मॅक्रॉन विजयी व्हावेत, अशी युरोपातील बहुतांश लोकांची इच्छा होती. देशातील बेरोजगारी हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. पुद्दुचेरीतून मतदान – फ्रान्सच्या वसाहती ज्या भागात होत्या, त्या ठिकाणीही मतदान झाले. यात भारताच्या पुद्दुचेरीचा समावेश होता. येथे 4600 मतदार होते. कराईकल, चेन्नईमध्येही मतदान केंद्र उभारण्यात आले होते.
वर्गशिक्षिकेबरोबर केले लग्न
प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. काहीवेळा माणसे आपल्यापेक्षा लहान किंवा जास्त वयाच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतात. अशा नात्यांकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन वेगळा असतो. पण ही माणसे जगाची पर्वा न करता आपले सहजीवन आनंदात व्यतित करत असतात. फ्रान्सचे नवीन राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची वैवाहिक पार्श्वभूमीसुद्धा अशीच आहे. त्यामुळेच इमॅन्युएल यांचे फ्रान्ससाठी व्हिजन काय आहे त्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याची माध्यमांमध्ये जास्त चर्चा रंगली आहे. फ्रान्समध्ये राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल 39 वर्षांचे आणि फर्स्ट लेडी 64 वर्षांची अशी अजब स्थिती आहे. इमॅन्युएल आणि ब्रिगिट्टी यांची प्रेमकथा विलक्षण आहे. इमॅन्युएल आपल्या शिक्षिकेच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्न केले. इमॅन्युएल 15 वर्षांचे असताना ब्रिगिट्टीबरोबर त्यांची पहिल्यांदा ओळख झाली. त्यावेळी ब्रिगिट्टी त्यांना ड्रामा विषय शिकवायची. पहिल्या भेटीतच इमॅन्युएल ब्रिगिट्टीच्या प्रेमात पडले.
आर्थिक सल्लागार आणि फ्रान्सचे अर्थमंत्री म्हणून अनुभव
फ्रान्सच्या इतिहासातला सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष होण्याचा मान मॅक्रॉन यांना मिळणार आहे. सन 2004मध्ये इन्व्हेस्टमेंट बँकर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर सन 2007 मध्ये अर्थमंत्रालयाच्या समित्यांचे काम त्यांनी पाहिले. सन 2012 ते 2014 या कालावधीत राष्ट्राध्यक्षांचे आर्थिक सल्लागार म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली होती. नंतर 2014 ते 2016 या काळात ते फ्रान्सचे अर्थमंत्री होते.
उजव्या विचारसरणीला जनतेचा नकार
राष्ट्राध्यक्षपदासाठी सर्वात महत्त्वाकांक्षी राहिलेल्या मरीन ली पेन यांचा मॅक्रॉन यांनी मोठ्या फरकाने पराभव केला. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत तेथील जनतेने उजव्या विचारसरणीला दिलेला कौल आपल्यालासुद्धा मिळेल, अशी महत्त्वाकांक्षा ली पेन यांनी बाळगली होती. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात चक्क देशभरातील मशिदी बंद पाडण्याचे आश्वासन दिले होते. केवळ मुस्लीमच नव्हे, तर ज्यू समुदायाकडूनसुद्धा ली पेन यांना विरोध होता. एवढेच नाही, त्यांच्या वडिलांनीसुद्धा आपली मुलगी राष्ट्राध्यक्ष पदाच्या लायकीची नाही असे वक्तक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचा पराभव हा निश्चित मानला जात होता.