श्रीनगर । दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत चाललेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. लष्करी अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहलगाव परिसरात ही चकमक झडली. ठार झालेले दहशतवादी हे हिज्बुल मुजाहिद्दीन या पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनेचे असून, अवुरा गावात एका घरात लपून बसलेल्या या दहशतवाद्यांची लष्करी जवानांशी चकमक झाली होती. त्यात एक दहशतवादी मारला गेला तर अन्य दोघे त्यानंतर राबविलेल्या शोधमोहिमेत मारले गेले आहेत.
अनेक दहशतवादी पळून गेले
अवुरा गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानुसार, लष्करी जवानांनी गावात शोधमोहिम राबविली. सीमा सुरक्षा दलाचे जवान प्रत्येक घराची चौकशी करत असताना अचानक एका घरातून दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यांना तातडीने जवानांनी प्रत्युत्तर दिले. त्यानंतर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बीएसएफच्या जवानांवर जोरदार गोळीबार सुरु केला. नेमके किती दहशतवादी होते हे कळले नसले तरी रात्रभर ही चकमक सुरु होती. दिवस उजडल्यानंतरही ही चकमक सुरु होती. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. घटनास्थळावरून तीन एके-47 रायफली हस्तगत करण्यात आल्या आहेत. दुपारनंतर ही चकमक संपल्याचे जाहीर करण्यात आले. तथापि, बरेच दहशतवादी पळून गेल्याची शक्यता पाहाता, या दहशतवाद्यांची जोरदार शोधमोहिम हाती घेण्यात आली होती.