मुख्यमंत्री खट्टर यांच्याकडून योगेश्वरला लग्नाचे अनोखे गिफ्ट!

0

-योगेश्वरच्या गावाच्या विकासकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा
-विविध मान्यवरांची उपस्थिती; १ रुपया शगुन घेतल्याने सर्वत्र कौतुक

चंदीगड: लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त लग्नबंधनात अडकला. त्याला त्याच्या विवाहप्रसंगी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडून एक भन्नाट गिफ्ट भेटले आहे. खट्टर यांनी योगेश्वरच्या गावाच्या विकासकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. योगेश्वरने देशाचे नाव उंचावले आहे. त्यामुळे त्याच्या गावकऱ्यांच्या सर्व मागण्या पूर्ण व्हायलाच हव्यात, असं मुख्यमंत्री म्हणाले. गावात महाविद्यालय सुरु करण्याचे देखील आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी योगेश्वरला दिले.

गावातही लग्नाचा उत्साह
लंडन ऑलिम्पिकचा कांस्यपदक विजेता पैलवान योगेश्वर दत्त लग्नबंधनात अडकला. हुंड्याच्या प्रथेला फाटा दिल्याने योगेश्वर आधीपासूनच चर्चेत आहे. योगेश्वरने शुभशकून म्हणून केवळ एक रुपये हुंडा स्वीकारुन देशवासियांची मने जिंकली. योगेश्वर आणि हरियाणातले काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा यांची मुलगी शीतल शर्मा यांचा सोमवारी विवाह झाला.
लग्नसोहळ्याला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी योगेश्वर दत्तला हे अनोखे गिफ्ट दिले. योगेश्वरच्या भैंसवाल या गावातही लग्नाचा उत्साह होता. लग्नाचे सर्व विधी याच गावात पूर्ण झाले.

प्रथा झुगारुन शकुनाचा एक रुपया हुंडा, योगेश्वर दत्त बोहल्यावर या विवाहसोहळ्याला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यापासून सर्व क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली.
योगेश्वर – शीतलच्या लग्नाला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, माजी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा, हरियाणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी उपस्थित होते. याशिवाय हरियाणातील आपचे नेते नवीन जयहिंद हे सपत्नीक हजर होते.

सतबीर यांनी जुळविले लग्न
कुस्तीच्या आखाड्यात भल्याभल्यांना धोबीपछाड देणाऱ्या योगेश्वरला, शीतल शर्माने ‘चीत’ केले. शीतल ही हरियाणा काँग्रेसचे नेते जयभगवान शर्मा यांची एकुलती एक मुलगी आहे. योगेश्वरचे वस्ताद सतबीर यांनी हे लग्न जमवल्याचे सांगण्यात आले. योगेश्वर दत्तने लंडन ऑलिंपिक खेळात ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकले आहे. ऑलिंपिक खेळात कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकणारा तो तिसरा भारतीय आहे. २००६ साली दोहायेथे झालेल्या एशियन गेम्स स्पर्धेत त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. २०१० मध्ये नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल खेळात त्याने ६० किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.