4 मंड्यांमधील ओल्या कचर्‍याचे विघटन महापालिका करणार

0

मुंबई । मुंबई महानगरपालिकेने सोसायट्या आणि आस्थापनांना कचरा वर्गीकरण सक्तीचे केले आहे. ओला कचर्‍याचे विघटन सोसायट्या आणि आस्थापनांच्या आवारातच करण्याचे पालिकेचे निर्देश आहेत. याच अनुषंगाने पालिकेने आपल्या अखत्यारीतील मंड्यांमध्ये निर्माण होणार ओला कचरा मंड्यांच्या आवारातच विघटन करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या 4 मंड्यांमधील ओला कचरा विघटन करण्यासाठी तब्बल 8 कोटी 35 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.

मनपाकडून 8 कोटी रुपयांची तरतूद
आता हा ओला कचरा वर्गीकरण करून त्यातील पाण्याचा अंश कमी केला जाणार आहे. नंतर ऑरगॅनिक वेस्ट कन्व्हर्टर मशीनद्वारे 24 तासामध्ये विघटन करून योग्य रीतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. ओल्या कचर्‍यामधून निर्माण होणार्‍या माती सदृश्य मॅन्युअरची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असून, त्याबदल्यात कंत्राटदार पालिकेला सवलत देणार आहे. त्यासाठी श्रेडर, कॉम्पॅक्टर व ऑरगॅनिक कन्व्हर्टर मशीनचा पुरवठा करणे, शेड बांधणे, संपूर्ण यंत्रणा 5 वर्षांसाठी चालवणे व त्याची देखभाल करण्यासाठी के. के. ब्रदर्स या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. पालिका चार मंड्यांमधील कचरा विघटन करण्यासाठी 8 कोटी 35 लाख 40 हजार 350 रुपये खर्च करणार आहे.

दादर भाजीपाला मंडीमधून दररोज 20 मेट्रिक टन कचरा
मुंबई महापालिका कचर्‍याचे निष्कासन करण्याकरिता प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या मंड्यामध्ये दररोज निर्माण होणार. ओला कचरा योग्य तंत्रज्ञान वापरून मंडईतच विघटन केले जाणार आहे. पालिकेच्या एकूण 91 मंड्यांपैकी 14 मंड्यांचे पुनर्निर्माण होत आहे. 25 मंड्यांचे मंडई असोसिएशन, विकासकांतर्फे पुनर्निर्माण झाले आहे. उर्वरित 52 मंड्यांपैकी चार मंड्यांमधील कचरा त्याच ठिकाणी विघटन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतले आहे. दादर पश्‍चिम येथील क्रांतिसिंह नाना पाटील मंडईमधून दररोज 20 मेट्रिक टन, दादर पश्‍चिम येथील मीनाताई ठाकरे फुल मंडईमधून दररोज 2.5 मेट्रिक टन, मालाड पश्‍चिम येथील साईनाथ मंडईमधून दररोज 2.5 मेट्रिक टन, तसेच बोरिवली मंडईमधून दररोज 2.5 मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. हा कचरा दिवसातून दोन वेळा उचलून डम्पिंगवर नेला जातो.