किरकोळ भांडणातून संतापात तरुणाने घेतला चार वर्षाच्या मुलाचा जीव

0

अनैतिक संबंध असलेल्या महिलेचा होता मुलगा ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदोषमनुष्य वधाचा गुन्हा ; संशयित पसार

जळगाव : अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या भेटीसाठी जळगावात आलेल्या विवाहित तरुणाने दारुच्या नशेत पेनाच्या शाईने शर्ट खराब करणार्‍या महिलेच्या चार वर्षाच्या मुलाच्या छातीत लाथ मारुन त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 2 वाजता रामेश्‍वर कॉलनीत घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात कैलास अशोक माळी वय 34 रा. शेंदुर्णी ता.जामनेर याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरण अंगलट येईल, हे कळताच संशयित कैलासने महिलेसह तिच्या मयत मुलाला जिल्हा रूग्णालयात सोडून पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

अनैतिक संबंधातून महिला जळगावात
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, कैलास हा शेंदुर्णी येथील रहिवाशी असून त्याला पत्नी व तीन मुली आहेत. तर निशा (बदललेले नाव) ही पहूर येथे पतीसोबत राहत होती. तिला एक मुलगा व तीन मुली आहेत. दोघांमध्ये अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्याने गेल्या वर्षी पावसाळ्यात त्यांनी घरातून पलायन केले. कैलास याने निशा हिला रामेश्वर कॉलनीत भाड्याने घर घेऊन दिले. काही महिन्यापासून तो आठवड्यातून दोन ते तीन दिवस निशाकडे येतो तर उर्वरित दिवस तो शेंदुर्णी येथे शेती करतो. निशा ही मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह भागविते.

पेनाच्या शाईने शर्ट खराब झाल्याने संताप
नेहमीप्रमाणे सोमवारी कैलास हा निशाला भेटण्यासाठी आला होता. यावेळी लाडाने जवळ आलेल्या चार वर्षाच्या महेशच्या हातून कै लासच्या शर्टाला पेनची शाई लागली. यावरुन कैलास भडकला, त्याने संताप केल्यावर महेश जवळच थांबल्याने त्याने महेशच्या छातीत जोरात लाथ मारली. यात तो लांब फेकला गेला व झटके द्यायला लागला. तोंडातून फेस व झटके येत असल्याने घाबरलेल्या कैलास याने निशा व शेजारच्या महिलांच्या मदतीने महेश याला दुचाकीवरुन रामेश्वर कॉलनीतील खासगी दवाखान्यात नेले. तेथे डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच काही अंतरावर चिमुकल्याने प्राण सोडले. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

महिलेसह मयत मुलाला सोडून संशयिताचे पलायन
महेशला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याने आता प्रकरण अंगाशी येईल, या भितीने कैलासने मयत महेश व निशा हिला जिल्हा रुग्णालयात सोडून पलायन केले. माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश बावरे, सहायक फौजदार अतुल वंजारी व शिवदास चौधरी यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. पोटच्या गोळ्याचा जीव गेल्याने निशा हिचा मन हेलावणारा आक्रोश सुरु होता. याचत पसार संशयित कैलास फोनवरुन निशाकडून माहिती घेत होता. अतुल वंजारी यांनी लागलीच लोकेशन काढले मात्र तेथूनही तो निसटला. संशयित कैलासच्या शोधार्थ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी पोलिसांचे एक पथक रवाना केल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान कैलास हा सतत मुलांना मारत असल्याचे शेजारी राहणार्‍या महिलांनी सांगितले.