म्हसळा । श्रीवर्धन आगार प्रमुखांच्या कारभारामुळे म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यांतील प्रवाशी जनता त्रस्त असल्याचे बोलले जात आहे. आगारप्रमुखांबद्दल तिव्र नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या चाळीस वर्षापासून सुरु असलेली श्रीवर्धन-गोरेगाव आणि श्रीवर्धन वाशिहवेली-मुंबई ही सेवा बंद करून सर्वसामान्य प्रवाशांचे जीवन विस्कळीत केले असल्याचा आरोप प्रवाशांमधून होत आहे. खामगांव पासून सात-आठ गाव व वाडीवरील असंख्य विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी म्हसळ्यात येतात. त्याचप्रमाणे दैनंदिन व्यवहार तसेच बाजारहाटसाठी म्हसळा मुख्य बाजारपेठ असल्याने जनतेला एसटीशिवाय कोणताही पर्याय नाही.
सकाळी नऊ-दहा वाजता शिक्षणासाठी घर सोडलेल्या विद्यार्थ्यांची शाळा संध्याकाळी पाच वाजता सुटते आणि म्हसळ्याहुन सायंकाळी सहा वाजता सुटणार्या श्रीवर्धन-गोरेगाव बसच्या प्रतीक्षेत विद्यार्थी असतो परंतु या सर्व अडचणी न जुमानता आगारप्रमुखानी कोणाचाही विचार न करता एसटी बंद करण्याचा अघोरी निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता ढासळुून जाते. कणघरचे सरपंच श्रीपत धोकटे यांनी आगारप्रमुखाशी चर्चा करण्यासाठी बरेच वेळा फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु आगारप्रमुखाने एकदाही फोन उचलला नाही. गाडी पूर्ववत सुरु न केल्यास व प्रवाशांची गैरसोय दूर न केल्यास श्रीवर्धन-खामगांव येथील सर्व ग्रामस्थ श्रीवर्धन-गोरेगाव मार्गावर एकही बस चालु देणार नाहीत व एस.टी.च्या बसेस रोखण्यासाठी जनआंदोलन करतील असा इशाराही सरपंच श्रीपत धोकटे यांनी दिला आहे.
अधिकार्यांमुळेच एसटी तोट्यात
श्रीवर्धन-वाशीहवेली-मुंबई ही गेली कित्येक वर्षे सुरु असणारी बसही बंद करून प्रवाशांवर अन्याय करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मार्गावरून मुंबईला जाणारी ही एकमेव सेवा असून तळा, रोहा, मुरुड, अलिबाग यांना जोडणारा हा दुवा असल्याचे निगडी सरपंच महादेव भीकू पाटिल यांनी सांगितले. ही बस सेवाही त्वरित चालू करण्याचे आवाहन या पंचक्रोशितील ग्रामस्थांनी केली आहे. एसटी खात्यातील अशा मनमानी अधिकार्यांमुळेच एसटी तोट्यात असून अशा अधिकार्यांच्या पगारातून तोटा भरून काढावा अशी चर्चाही संतप्त प्रवाशांनी केली.