40 + स्पर्धेत कोपरखैरणे, ऐरोली विजेतेपदाचे मानकरी

0

नवी मुंबई । वयाच्या चाळिशीनंतर आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याचा वैद्यकीय सल्ला दिला जातो. मात्र, नवी मुंबईतील फोर्टी प्लस क्रिकेट या नावीन्यपूर्ण संकल्पनेने यादृष्टीने आधीच जागरूकता दाखवत आरोग्य आणि स्वास्थ्य रक्षणाचा एक चांगला संदेश मागील अनेक वर्षांपासून प्रसारित केला आहे याबद्दल गौरवोद्गार काढत नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांनी महापौर चषक फोर्टी प्लस क्रिकेट स्पर्धेमध्ये यावर्षी 32 ग्रामीण व 14 शहरी संघांनी तसेच 3 निमंत्रित संघांनी सहभागी होत मागील वर्षीपेक्षा अधिक उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अभिनंदन केले. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनच्या मैदानावर 24 व 25 फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या नवी मुंबई महापौर चषक फोर्टी प्लस स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याप्रसंगी ते आपले मनोगत व्यक्त करत होते. याप्रसंगी महापौर महोदयांसमवेत मंचावर क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती तथा स्पर्धा निमंत्रक विशाल डोळस, नगरसेवक सुनील पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, फोर्टी प्लस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मास्टर प्रदीप पाटील, सचिव लीलाधर पाटील, कार्यकारिणी सदस्य भालचंद्र दळवी, विकास मोकल, सुरेश राणी, संतोष शेट्टी, अजित कांडर, रवी भोसले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण विभागात गावदेवी फोर्टी प्लस, सानपाडा व वाशीगाव फोर्टी प्लसचे संघ तसेच शहरी विभागात नेरूळ फ्रेंड्स फोर्टी प्लस संघ तिसर्‍या क्रमांकाचे मानकरी ठरले. ग्रामीण विभागात कोपरखैरणे फोर्टी प्लस संघातील रविकांत म्हात्रे तसेच शहरी विभागात युनायटेड ऐरोलीचे राम पोळ मालिकावीर चषकाचे मानकरी ठरले. ग्रामीण विभागात बेलापूर फोर्टी प्लस संघाचे प्रकाश बंदरे यांना उत्कृष्ट फलंदाज, सानपाडा फोर्टी प्लस संघाचे प्रकाश मढवी यांना उत्कृष्ट गोलंदाज तसेच वाशी फोर्टी प्लस संघाचे मनोज म्हात्रे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.शहरी विभागात नेरूळ फ्रेंड्स फोर्टी प्लस संघाचे जितू परदेशी यांना उत्कृष्ट फलंदाज, सत्यमेव ऐरोली फोर्टी प्लस संघाचे अनिल नाकते यांना उत्कृष्ट गोलंदाज तसेच युनायटेड ऐरोली फोर्टी प्लस संघाचे महेंद्र शिंदे यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात आली.

स्मृतिचिन्ह देऊन सन्मान!
याप्रसंगी बोलताना स्पर्धा निमंत्रक तथा क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सभापती विशाल डोळस यांनी आपल्या मनोगतात नवी मुंबई महानगरपालिका विविध खेळांना प्रोत्साहित करण्याचे काम करत असून, पुढील वर्षी फोर्टी प्लस क्रिकेट सामने प्रकाशझोतात आयोजित करण्याचा मानस असल्याचे सांगितले. नवी मुंबई महापौर चषकांतर्गत झालेल्या फोर्टी प्लस क्रिकेट सामन्यांत ग्रामीण विभागात कोपरखैरणे फोर्टी प्लसच्या संघाने बेलापूर फोर्टी प्लस संघावर 25 धावांनी मात करत विजेतेपदाचा महापौर चषक पटकावला. शहरी विभागात युनायटेड ऐरोली संघाने सत्यमेव ऐरोली संघावर अंतिम सामन्यात मात करत नवी मुंबई महापौर चषकावर आपला विजेतेपदाचा ठसा उमटवला.निमंत्रितांच्या प्रदर्शनीय सामन्यात संजीवन ग्रूप विजेतेपदाचे मानकरी ठरले. प्रदर्शनीय सामन्यात प्रकाश म्हात्रे यांना उत्कृष्ट फलंदाज व महादेव डुंबरे यांना उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.