40 हजारांची लाच भोवली ; त्रिकूट एसीबीच्या जाळ्यात

0

भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयातील वरीष्ठ लिपिकासह जात पडताळणी व रायसोनी अभियांत्रिकीचा लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात ; मध्यरात्री उशिरापर्यंत चालली कारवाई

भुसावळ- शहरातील हिंदी सेवा मंडळाच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी लागणारे जातप्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) विनाविलंब मिळवून देण्यासाठी 40 हजारांची लाच मागणार्‍या हिंदी सेवा मंडळाच्या श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयातील वरीष्ठ लिपिक घनशाम रामगोपाल टेमानी (40, राम मंदीर वॉर्ड, भुसावळ) यास बुधवारी सायंकाळी उशिरा शहरातील रेल्वे चर्चजवळील गार्ड लाईन भागात रंगेहाथ अटक केल्यानंतर हे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मदत करणार्‍या ललित खुशाल किरंगे (42, रा.वेडीमाता मंदिराजवळ, विद्यानगर, भुसावळ) व जळगावच्या जात पडताळणी समिती कार्यालयातील वरीष्ठ लिपिक ललित वाल्मीक ठाकरे (39, रा.सेंट्रल बँक कॉलनी, पिंप्राळा, जळगाव) यांच्याही एसीबीने रात्री उशिरा मुसक्या आवळल्याने जिल्हाभरात खळबळ उडाली. आरोपींना गुरूवारी दुपारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता 8 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड.विजय खडसे यांनी तर आरोपींतर्फे अ‍ॅड.सागर चित्रे,ए.एस.गुप्ता व वसीम खान यांनी काम पाहिले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत एक-एक आरोपीच्या मुसक्या गोपनीय पद्धत्तीने आवळल्या जात असल्याने भुसावळात नेमका ट्रॅप कुणावर झाला? याची चांगलीच चर्चा रंगली होती. सुरुवातीला पोलिस विभाग नंतर भूमी अभिलेख व शिक्षण विभागात ट्रॅप झाल्याची चर्चा होती मात्र मध्यरात्री या सर्व चर्चांना ‘जनशक्ती’ने ऑनलाईन सविस्तर वृत्त दिल्यानंतर पूर्णविराम मिळाला.

नोंदीविनाच बाहेर आले प्रमाणपत्र
लाच प्रकरणात जात पडताळणी विभागाचा वरीष्ठ क्लर्कही सहभागी असल्याने पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर व सहकार्‍यांनी गुरुवारी सकाळीच समितीचे कार्यालय गाठले. याप्रसंगी तक्रारदाराने केलेले अर्ज, फाटे तसेच रजिष्टर जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे जात पडताळणी कार्यालयातून जात प्रमाणपत्र देताना त्याची नोंद रजिस्टरमध्ये केली जाते मात्र तक्रारदाराच्या पाल्याची त्यात नोंदच आढळली नाही तसेच काऊंटर स्लीपदेखील स्वाक्षर्‍या आढळल्या नाहीत.

उपायुक्तांची एसीबीकडून चौकशी
जात पडताळणी समितीच्या उपायुक्त वैशाली हिंगे यांची उपअधीक्षक ठाकूर यांनी चौकशी केली. कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या कामकाज तसेच जवाबदारीबाबत त्यांनी विचारणा केली. कुठल्याही नोंदणीशिवाय प्रमाणपत्र बाहेर गेले कसे? याबाबतही त्यांनी विचारणा केली. याबाबीला ठाकूर यांनी दुजोरा यात या प्रकरणात वरीष्ठांचा सहभाग आहे वा नाही? हा तपासाचा भाग असल्याचे सांगत चौकशीत जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे ते म्हणाले.

जात पडताळणी समिती रडारवर
जातप्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी) मिळण्यासाठी हजारो अर्ज पडून असताना वरीष्ठ लिपिकाकडून थेट नोंदणीविनाच प्रमाणपत्र बाहेर गेल्याने यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याची दाट शक्यता आहे. एखादा क्लर्क एकटाच हा प्रकार करू शकत नसल्याचे उघडपणे नागरीक बोलत असून एसीबीने या प्रकरणाचा खोलवर तपास करून दोषींच्या मुसक्या आवळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

असा झाला सापळा यशस्वी
तक्रारदाराच्या पाल्याला अभियांत्रिकीतील प्रवेशासाठी जातप्रमाणपत्र आवश्यक असल्याने आरोपी घनश्याम टेमानीने 40 हजारांची लाच मागितल्यानंतर एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर सापळा रचण्यात आला. सायंकाळी साडेसहा वाजेपासून फिल्डींग लावण्यात आली. आरोपीने लाच देण्यासाठी रेल्वेच्या गार्डलाईन परीसरात तक्रारदाराला बोलावले. तक्रारदाराने लाचेची रक्कम देतो मात्र जात प्रमाणपत्र कुठे आहे? याची विचारणा केल्यानंतर आरोपी टेमानीने आपल्या पत्नीला लावून प्रमाणपत्राची कॉपी व्हॉटसऊअ‍ॅपवर मागवली. कॉपीची पडताळणी झाल्यानंतर तक्रारदाराने लाच देताना इशारा करताच पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या. यावेळी आरोपी खोलवर चौकशी केल्यानंतर या प्रकरणात मित्र ललित किरंगे सहभागी असल्याचे सांगून त्यांची जातपडताळणी समितीतील वरीष्ठ क्लर्क ललित ठाकरे याच्याशी लिंक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने दोघांच्या जळगावातून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

या अधिकार्‍यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर, पोलिस निरीक्षक निलेश लोधी, एएसआय रवींद्र माळी, पोलिस नाईक मनोज जोशी, पोलिस नाईक जनार्दन चौधरी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकूर, प्रवीण पाटील, महेश सोमवंशी, नासीर देशमुख, ईश्वर धनगर आदींच्या पथकाने केली. तपास पोलिस निरीक्षक निलेश लोधी करीत आहेत.