मुंबई : कमी किमतीत आयात केलेली तूर हमी भावाने शेतकर्यांच्या नावावर विकून 400 कोटी रुपयांच्या तूर खरेदीत घोटाळा झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील तूर खरेदीची सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी विधिमंडळातील पत्रकार कक्षात पत्रकारांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही एका कार्यक्रमात तूर खरेदीत 400 कोटींचा घोटाळा झाल्याचे जाहिर केले होते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रात यंदा तूरीचे विक्रमी उत्पादन झाले असताना त्याचे नियोजन करण्यात राज्य सरकार सलग दोन वर्षे अपयश आल्याचा ठपका ठेवत यावेळी तुरीच्या खरेदीबाबत सरकारकडून झालेल्या ढिसाळ आणि गलथान कारभारावर चव्हाण यांनी कडाडून हल्ला चढवला.
राज्यात हमीभावाने तूर खरेदी केल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी नेमकी वस्तूस्थिती काय आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारच्या आकडेवारीनुसार खरीप 2015 हंगामात महाराष्ट्रात 12.37 लाख हेक्टर जमिनीवर तूर लावली गेली आणि त्यामधून 4.44 लाख टन तूर डाळीचे उत्पादन झाले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार आणि शेतकर्यांना गेल्यावर्षी मिळालेल्या वाढीव हमी भावामुळे शेतकर्यांनी 2016 च्या खरीप हंगामात गेल्या वर्षीच्या तुलनेत 25 टक्के अधिक म्हणजेच 15.33 लाख हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड केली. मात्र, राज्य सरकारच्या उत्पादनाच्या आकडेवारीवरुन कुठेतरी पाणी मुरत असल्याची शंकाही त्यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने सप्टेंबर 2016 मध्ये जाहिर केलेल्या उत्पादनाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील डाळींचे उत्पादन 12.56 लाख टन होईल असे जाहिर केले. मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशनात विधानसभेत 11.71 लाख टन उत्पादन अपेक्षित असल्याची माहिती दिली. एप्रिल महिन्यात राज्यातील तूरीचे उत्पादन 20.35 लाख टन होईल असे केंद्र सरकारला कळविले. त्यामुळे तीन महिन्यात 11.71 लाख टनावरुन 20.35 लाख टन कसे वाढले? असा सवालही त्यांनी राज्य सरकारला विचारला.राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात तुरीचे उत्पादन खरेच झाले आहे का, किती तूर खरेदी झाली, किती शिल्लक आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जाहिर केलेला घोटाळा कोणत्या स्तरावर झाला आहे याची माहिती जनतेला द्यावी असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला यावेळी केले.
आयात शुल्कात वाढ करा; निर्यात बंदी उठवा
महाराष्ट्रात तुरीचे विक्रमी उत्पादन झाले असताना बाहेरच्या देशातून तूरीची आयात कशासाठी करण्यात आली असा सवाल करत मोझांबिक, म्यानमार आदी देशांबरोबरच कर्नाटक राज्यातून लाखो टन तूर राज्यात आयात केली. तूरडाळीच्या आयातीवर यापूर्वी शुल्क आकारले जात नव्हते. आता त्यावर दहा टक्के आयात शुल्क आकारले जाऊ लागले. परंतु, तुरीच्या आयातीवर निर्बंध आणण्यासाठी आयात शुल्क 25 टक्के करावे, अशी मागणी करत केंद्राने तूर निर्यातीवरील बंदी उठवावी अशी मागणीही त्यांनी केली.