400 मीटर उपांत्य फेरीत निर्मलाने केली निराशा

0

लंडन। जागतिक अ‍ॅथेलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या निराशाजनक कामगिरीचा सिलसीला कायम आहे. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत उपांत्य फेरीत भारताची निर्मला शेरॉन शेवटून तिसर्‍या स्थानावर राहिली. 22 वर्षीय निर्मलाला यावेळी स्वत:च्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपास जाता आले नाही. निर्मलाने 53.07 सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. याआधी तिची सर्वोत्तम कामगिरी 51.28 सेकंद अशी होती. उपांत्य फेरीतल्या दुसर्‍या हीटमध्ये सातव्या स्थान मिळवणारी निर्मला 24 धावपटूंमध्ये 22 व्या स्थानावर राहिली. उपांत्य फेरीच्या तीन हीटमधील आघाडीचे पहिले दोन धावपटूंना अंतिम फेरीत स्थान मिळाले. बहरिनची सल्वा ईद नासिर 50.08 सेकंद अशा कामगिरीसह अव्वल
स्थानावर राहिली.

निर्मलाला पुनरावृत्ती करता आली नाही
गतविजेती आणि रिओ ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती एलिसन फेलिक्सने दुसरे स्थान मिळवले. हरियाणाच्या निर्मलाने आपल्या सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती केली असती तर तिला अंतिम फेरीत स्थान मिळाले असते. प्राथमिक फेरीत निर्मलाने 52.01 सेकंद अशी वेळ नोंदवली होती. पण, या कामगिरीची पुनरावृत्ती तिला अंतिम फेरीत करता आली नाही. मागील महिन्यात भुवनेश्‍वरमध्ये झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत निर्मलाने याच कामगिरीच्या जोरावर सुवर्णपदक जिंकले होते. सोमवारी झालेल्या हीटमध्ये निर्मलाने चौथे स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला होता.

मॅक्लियॉडला सुवर्णपदक
ऑलिम्पिक विजेत्या जमैकाच्या उमर मॅक्लियॉडने 100 मीटर अडथळ्याची शर्यत जिंकत देशवासीयांना खूश केले. युसैन बोल्ट आणि एलिन थॉमसनला 100 मीटरच्या शर्यतीत मिळालेल्या अपयशामुळे जमैकाचे निराश झाले होते. पण सोमवारी रात्री उशिराने झालेल्या या शर्यतीत 23 वर्षीय मॅकिल्यॉडने 13. 04 सेकंद अशी कामगिरी साधत सुवर्णपदक जिंकले. मॅक्लियॉडने हा विजय युसैन बोल्टला अर्पण केला. मॅक्लियॉड म्हणाला की, खर सांगायच झाले तर मला जमैकाचा झेंडा उंचावर ठेवायचा होता आणि ते मी केले. युसैन बोल्ट आताही महान आहे.