संघ परिवाराचे गाय माहात्म्य!

0

भाजप किंवा संघ परिवारातले लोक केवळ जिभेचा पट्टा चालवण्यात तरबेज आहेत, जबाबदारी आली की पळ काढतात, जास्त मुलांची पैदास असो की गोमातेचा विषय असो, यापैकी त्यांना स्वतःला काहीच करावेसे वाटत नाही. एकही बोलघेवडा नेता बंगल्यात गाय पाळत नाही जो पाळतो तो अशी उटपटांग वक्तव्ये करत नाही. कारण वस्तुस्थितीची जाणीव त्याला असते. लालू गोपालक आहेत. परंतु, कधीच गायीचे अवैज्ञानिक माहात्म्य सांगावेसे त्यांना वाटत नाही.

श्‍वास घेताना प्राणवायू घेऊन प्राणवायूच सोडणारा गाय हा जगातील एकमेव प्राणी आहे असे अफलातून वक्तव्य राजस्थानचे शिक्षण आणि पंचायत राज्यमंत्री वासुदेव देवनानी यांनी तेथील हिंगोनिया गोशाळेत आयोजित एका कार्यक्रमात केल्यानंतर सध्या देशभरात त्याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहेत. गोभक्त गायीची महती तर विज्ञानवादी वास्तव सांगताना दिसत आहेत. गाय हा मुळातच संघ परिवाराचा सुरुवातीपासून कथित आस्थेचा आणि अनेकदा राजकारणाचा विषय राहिला आहे. गाय नाव घेतले की सगळे धार्मिक, पौराणिक संदर्भ डोळ्यापुढे येतात. भारतीय व्यक्ती तशीही पापभिरू आणि पुराणप्रिय असल्यामुळे गायीचा जप करणारा इथे नेहमी फायद्यात राहतो असा आजवरचा अनुभव आहे. हे देवनानी महाशय ज्यांच्या नेतृत्वात काम करतात त्या राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे धार्मिक कर्मकांडात सदैव आघाडीवर असणार्‍या नेत्या आहेत. सीमेवरील टनोट माता मंदिरात त्यांनी केलेला महायज्ञ असाच गाजला होता, कुणालातरी सद्बुद्धी देण्यासाठी त्याचे आयोजन वसुंधरा राजेंनी केले होते.

तसाही राजस्थान हा देशातला एकमेव प्रांत आहे की जिथे गो कल्याण मंत्रालय आणि त्यासाठी स्वतंत्र मंत्री नेमला गेला आहे, यावरून त्या प्रदेशातील जनतेची मानसिकता नक्कीच कळून यायला मदत होते. याच राजस्थानच्या हायकोर्टाच्या प्रांगणात मनूचा पुतळा दिमाखाने उभा असतो आणि याच प्रदेशात काही दशकापूर्वी रूपकुवरला सती पाठवले जाते. त्यामुळे पारंपरिक व्यवस्थेला इथला माणूस घट्ट मिठी मारून असतो म्हणूनच भाजपाला आपले पाय मजबूतपणे रोवण्यासाठी या जमिनीचा भक्कम उपयोग झाला. जिथे धार्मिक मानसिकता असते तिथे भाजप किंवा संघ परिवार लवकर प्रवेश करतो आणि खोलवर मुळे पसरवतो हे आता लपून राहिले नाही. धर्माचा संबंध संघाने अनेक बाबींशी जोडला असल्यामुळे त्या साखळीतील सगळ्या बाबी हा परिवार सातत्याने तपासून बघत असतो. अनेकदा त्याची कृती म्हणजे लिटमस टेस्ट असते, त्याची अपेक्षित फळे मिळाली की परिवार आघाडी घेतो आणि एखादा विषय अंगावर उलटतोय असे लक्षात येताच अशा वक्तव्याशी असहमती दर्शवली जाते, प्लॅन बी त्यांचा नेहमीच तयार असतो.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न आणि कृषी संघटनेच्या 2006 च्या अहवालात उलट असे म्हटले आहे की जागतिक तापमानास कारणीभूत ठरणारे 18 टक्के ग्रीन हाऊस गॅसेस अन्य पाळीव प्राण्यांमुळे बाहेर फेकले जातात आणि हे प्रमाण विमानासह सर्व प्रकारच्या वाहनांमुळे होणार्‍या एकत्रित उत्सर्जनाहून जास्त आहे. या अहवालास वैज्ञानिक प्रमाणाचा भक्कम आधार आहे. मात्र, भाजपच्या या मंत्र्यांची मुक्ताफळे थेट विज्ञानाला आव्हान देणारी आणि पापभिरू जनतेत मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा बळकट करणारी आहेत. ही विधाने कोणत्याही विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक असली, तरी ज्यांना संघ परिवार थोडाफार कळतो त्यांना याबाबत फारसे नवल वाटत नाही. गाय, गीता, गायत्री आणि गंगा ही भाजपची राजकीय आणि सामाजिक अस्त्रे बनली आहेत. त्यांच्या माध्यमातून देशद्रोही आणि देशप्रेमाची प्रमाणपत्रे वाटली जातात.

हा परिवार ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना हिंदुहृदय सम्राट मानतो. त्यांची मते गायीबाबत काय होती याकडे तरी एखादा कटाक्ष टाकायला हवा होता. सावरकरांनी आपल्या आयुष्यात जे विपुल लेखन करून ठेवले आहे, त्यात हिंदू धर्मातील अनिष्ट रुढी, प्रथा आणि देवभोळ्या कल्पनांचा पंचनामा करणारे विज्ञाननिष्ठ लेखन समाविष्ट आहे. अशा लेखांचा संग्रह क्ष-किरण या नावाने प्रसिद्ध आहे. त्याकाळात महाराष्ट्र शारदा या अनियतकालिकात त्यांनी अतिशय गाजलेला लेख लिहिला होता, या लेखाचे त्यांच्या जीवनावर गंभीर परिणामसुद्धा झाले होते. त्या लेखाचे शीर्षक होते गाय : एक उपयुक्त पशु, माता नव्हे, देवता तर नव्हेच नव्हे! आपला देश हजारो वर्षे मोघलांचा गुलाम राहिला त्याचे मूळ कारण सावरकरांनी गायीला मानले आहे एवढेच नव्हे, तर गायीच्या अंगात तेहतीस कोटी देवतांच्या कल्पनेची त्यांनी जी खिल्ली उडवली त्याचा आहे तसा वापर केला तर आजच्या काळात दंगली होतील एवढे जहाल लेखन केले आहे.

भाजप किंवा संघ परिवारातले लोक केवळ जिभेचा पट्टा चालवण्यात तरबेज आहेत, जबाबदारी आली की पळ काढतात, जास्त मुलांची पैदास असो की गोमातेचा विषय असो, यापैकी त्यांना स्वतःला काहीच करावेसे वाटत नाही. एकही बोलघेवडा नेता बंगल्यात गाय पाळत नाही जो पाळतो तो अशी उटपटांग वक्तव्ये करीत नाही कारण वस्तुस्थितीची जाणीव त्याला झालेली असते. लालू गोपालक आहेत. परंतु, कधीच गायीचे अवैज्ञानिक माहात्म्य सांगावेसे त्यांना वाटत नाही. गुरांचा उपयोग कितपत असतो याची मर्यादा उत्तमपणे कळते. गायीला केवळ धार्मिक महत्त्व आहे म्हणून ही सगळी अवैज्ञानिक फोकनाडबाजी संघपरिवारातल्या अनेक संघटना नेहमी करीत असतात. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे एकदा शीर्षस्थ नेत्यांनी ठरवले असेल तर खाली स्वयंसेवक शब्दांच्या चिंध्या फाडत बसत नाहीत तर त्याचे उदात्तीकरण होण्याच्या कडी जोडत जातात आणि गाय ही त्यातली भारतीय मेंदूत कायम वसलेली कडी आहे, हे लक्षात आले की पुढेच सोपे जाते.