नवी दिल्ली : पण सरावास दांडी मारलेल्या सुनीत नागलला संघातून वगळल्याचे भारतीय टेनिस संघटनेच्या सूत्रांनी सांगितले आहे. डेव्हिस चषकाच्या पदार्पणात सुनीत नागलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो खूप गुणी खेळाडू आहे. केवळ १९ वर्षांचा आहे. भारतीय संघासोबत सरावाची संधी मिळाली होती. या परिस्थितीत त्याच्याकडून या प्रकारची वागणूक अपेक्षित नव्हती. आता तो न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीसाठी संघात नसेल, असे टेनिस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेल रूमवर
नागलने गतवर्षी विम्बल्डन कुमार स्पर्धा जिंकली होती. तो स्पेनविरुद्धच्या लढतीच्या वेळी गर्लफ्रेंडला घेऊन हॉटेल रूमवर आला होता. कर्णधार आनंद अमृतराज यांनी त्या मुलीला पाठवण्यास सांगितल्यावर त्याने ते ऐकले; पण त्यानंतर त्याच्याबाबतच्या अनेक बातम्या कानावर आल्या. त्याने यात तथ्य नसल्याचे सांगितले. अनेकांनी याबाबत सांगितल्यावर त्याच्यावर कारवाईचा निर्णय झाला, असेही सूत्रांनी नमूद केले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या जुलैमधील लढतीच्या वेळी नागलने शिस्तीचा भंग केला होता. त्याने रूममधील मिनी बार पूर्ण संपवला होता.
बेशिस्त चालणार नाही
स्पेनविरुद्धच्या परतीच्या एकेरीच्या लढतीच्या वेळी श्वास घेताना त्रास होत असल्याची तक्रार तो करीत होता. १९ वर्षांचा खेळाडू खेळू शकत नसेल, तर त्याला संघात कसे ठेवणार. अर्थात, त्याला कायमचा बाहेर ठेवण्याची आमची तयारी नाही. या गुणवान खेळाडूचे भवितव्य उज्ज्वल आहे. बेशिस्तीला संघात थारा देणार नाही, असेही संघ व्यवस्थापनाकडून सांगितले गेले आहे.