41 हजार जणांनी डाऊनलोड केले स्वच्छता अ‍ॅप

0

पिंपरी-चिंचवड : ‘स्वच्छ सर्वेक्षण 2018’ या चार हजार गुणांच्या ‘स्वच्छ’ परीक्षेत अग्रक्रमावर येण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून शहरवासियांना ‘स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला शहरवासियांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून डिसेंबर अखेर 41 हजार 493 जणांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या स्पर्धेत पालिका 17 व्या क्रमांकावर असून त्याचे 400 गुण निश्चित झाले आहेत.

शनिवारपासून स्वच्छ भारत सर्वेक्षण
पिंपरी-चिंचवड शहरात 4 जानेवारीपासून स्वच्छ भारत सर्वेक्षण सुरू होणार आहे. स्वच्छ सर्वेक्षण 2018’ या स्पर्धेत चार हजार शहरे सहभागी झाली आहेत. याचे तीन गटात वर्गीकरण करण्यात आले असून एक लाख लोकसंख्या, एक ते दहा लाख आणि दहा लाखाच्या पुढे लोकसंख्या असलेले शहर अशी वर्गवारी करण्यात आली होती. 2011 च्या जनगणनेनुसार पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या 17 लाख आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहराला 35 हजार स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे टार्गेट होते.

डाऊनलोडसाठी पालिकेचे मोठे प्रयत्न
अधिक-अधिक नागरिकांनी ’स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्यासाठी महापालिकेने मोठे प्रयत्न केले. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, मोहल्ले, सर्व मॉल अशा विविध ठिकाणी जाऊन नागरिकांना स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले होते. तर, महापालिकेतील अधिकारी, प्रादेशिक परिवहन महामंडळ (आरटीओ), पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण आणि शहरातील सर्व कंपन्यांना पालिकेने पत्र पाठवून ’स्वच्छता अ‍ॅप’ डाऊनलोड करण्याचे त्यांना बंधनकारक करण्यात आले होते. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.

सारथी हेल्पलाईनमुळे मोठा फायदा
31 डिसेंबरपर्यंत अ‍ॅप डाऊनलोड करण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीमध्ये 41 हजार 493 जणांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या स्पर्धेत महापालिका 17 व्या क्रमांकावर असून त्याचे 400 गुण निश्चित झाले आहेत. यासाठी महापालिकेच्या ‘सारथी’ हेल्पलाईनचा मोठा फायदा झाला आहे. अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी आणखी एक महिन्याची मुदत दिली आहे. परंतु, या नंतर डाऊनलोड होणा-या अ‍ॅपची गुणांसाठी गणना केली जाणार नाही.

अ‍ॅपवरील तक्रारींचे निराकारण
स्वच्छता अ‍ॅपवरील तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पालिकेने स्वतंत्र ’स्वच्छ भारत’ सेल तयार केला आहे. आजपर्यंत स्वच्छता अ‍ॅपवर 29 हजार 962 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 29 हजार 204 तक्रारींचे निराकरण करण्यात आले असून 52 तक्रारींवर निराकरण करण्याचे काम सुरु आहे. तर, 399 तक्रारींचे निराकरण झाले नसून 300 तक्रारी नाकारल्या आहेत. ग्वाल्हेर महापालिका अ‍ॅप डाऊनलोड करण्यात पहिली तर कानपूर महापालिका दुसर्‍या क्रमांकावर आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका 17 व्या क्रमांकावर आहे. 20 जानेवारीनंतर पिंपरी-चिंचवड शहर पाहणीसाठी अधिकारी येण्याची शक्यता आहे.