सचिन, सौरव, लक्ष्मणच्या समितीवरही येणार गदा!

0

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक संघाला दणका दिल्यानंतर लोढा समितीने अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. आता लोढा समितीने सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मणचा समावेश असलेली क्रिकेट समितीच रद्द करण्याचे ठरवले आहे. या समितीनेच अनिल कुंबळे यांची मार्गदर्शकपदी नियुक्ती केली होती; पण आता मार्गदर्शकांपासून अन्य कर्मचाऱ्यांच्या निवडीपर्यंतचे अधिकार संघनिवड करणाऱ्या समितीसच असतील, असे सूत्रांनी सांगितले.

निवड समितीचे नामकरण क्रिकेट समिती
लोढा समितीने सुचवल्यानंतर प्रशासकांची समिती १९ जानेवारीपासून भारतीय मंडळाची सूत्रे आपल्या हाती घेणार आहे. मात्र, ही समिती क्रिकेटसंदर्भातील निर्णय निवड समितीच्या शिफारशीनुसारच घेणार आहे. लोढा समितीने निवड समितीचे नामकरणच क्रिकेट समिती, असे केले आहे. समितीच्या शिफारशीनुसार ही समिती भारतीय संघाची निवड करेल; तसेच ते मार्गदर्शकांसह सपोर्ट स्टाफची निवड करतील आणि संघाच्या कामगिरीचा तीन महिन्यांचा अहवालही प्रशासकीय समितीस सादर करतील. एकंदरीत त्यामुळे अर्थातच गांगुली, तेंडुलकर व लक्ष्मणचा समावेश असलेली क्रिकेट समिती आता गुंडाळली जाणार हे स्पष्ट आहे.