0

फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप हे सध्या सतत कानावर पडणारे शब्द. बरं हे म्हणजे काय? असा प्रश्‍न विचारावा तर बर्‍यापैकी सगळ्यांच्याच परिचयाचे असलेले हे शब्द, असंच उत्तर मिळतं. आज या शब्दांनी माध्यमांची व्याख्याच बदलून टाकलीय. जणू काही फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यांच्यामुळे सहजरित्या जनसामान्यांच्या हाती माध्यमांनी प्रवेश केलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. 5-7 वर्षांपूर्वी असलेली माध्यमांची मक्तेदारी या नव माध्यमांनी मोडीत काढण्याचा प्रयत्न चालवलाय; पण त्याच सोबत पारंपरिक माध्यमांनी जपलेली विश्‍वासार्हता, सजगपणा धोक्यात येऊ लागलाय. या नव माध्यमांनी मोठी सामाजिक आणि आर्थिक क्रांती घडवून आणलीय. कॅनेडियन विचारवंत मार्शल मॅकलुहान यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात म्हणजेच ज्यावेळेस औद्योगिक क्रांती युरोप-अमेरिकेमध्ये भरात येत होती त्यावेळेस या नवीन माध्यमांमुळे होणार्‍या संज्ञापन व माध्यम क्रांतीची दिशा ओळखली. मार्शल मॅकलुहान यांनी म्हटल्याप्रमाणे खरंच सद्यस्थितीमध्ये या माध्यमांच्या आणि संज्ञापनाच्या क्रांतीने मानवी जीवनाला कलाटणी दिलेली आहे आणि याच कलाटणीचा दूरगामी परिणाम माध्यम क्षेत्रावरही होऊ लागलाय.

माध्यमांच्या या क्रांतीमुळेच जग एक खेडे म्हणजेच ग्लोबल व्हिलेज ही संकल्पना अधिकाधिक दृढ होऊ लागलीय. या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे दुरावलेला माणूस पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ लागलाय, आणि माध्यमांच्या या क्रांतीमुळेच मासमीडियाकडून आयमीडियाकडे प्रवास सुरू झालेला आहे. आयमीडिया म्हणजे हाती असलेल्या तंत्रज्ञानामुळे सहजरीत्या उपलब्ध असलेली माध्यमं.

पारंपरिक माध्यमे, जसे की रेडीओ, वृत्तपत्रे ही जरी जनसामान्यांसाठी असली तरी त्यांच्याकरिता सहज उपलब्ध नव्हती. म्हणजेच काय तर समजा एखाद्या प्रसिद्ध झालेल्या बातमीवर किंवा लेखावर जर साधे मतप्रदर्शन करायचे असेल तरी त्याला वेळ जायचा, कदाचित वाचकाने व्यक्त केलेले मत हे त्या माध्यमाच्या बाजूचे नसेल तर प्रसिद्ध होण्याची शक्यताही नसायची. इंटरनेटमुळे सहजरीत्या हाताच्या तळव्यावर विसावणार्‍या फेसबुक, ट्विटर सारख्या सामाजिक नव माध्यमांनी तर माध्यमांची मक्तेदारीच जणूकाही मोडीत काढलीय. माध्यमांच्या या क्रांतीमुळे माहितीची जबरदस्त देवाणघेवाण सुरू झालेली आहे आणि हे तंत्रज्ञान वापरणारे लोक उद्याची दिशा ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत, कारण ही नव माध्यमं जागतिक आणि परस्परसंवादी (ळपींशीरलींर्ळींश) आहेत आणि त्यामुळेच या नवमाध्यमांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. याचा अर्थ पारंपरिक माध्यमं लोकप्रिय नव्हती असा नाही. पारंपरिक माध्यमांची विश्‍वासार्हता ही निश्‍चितपणे नव माध्यमांपेक्षा जास्त आहे. तसं पाहता प्रत्यके काळात उपलब्ध सामग्री आणि तंत्रज्ञानानुसार वापरली जाणारी माध्यमे ही त्या त्या काळातील नवीन माध्यमे म्हणून ओळखली जातात. हीच त्या काळात नवीन असलेली माध्यमे कालांतराने त्यांची जागा अजून कोणत्या नव्या माध्यमांनी घेतली की पारंपरिक माध्यमे या वर्गात येतात.

नव माध्यमं म्हणजे प्रचलित असलेल्या माध्यमाला उपलब्ध तंत्रज्ञान आणि संवादाच्या साधनांमुळे ज्या नव्या माध्यमाची जोड मिळते किंवा प्रचलित माध्यमाची जागा जे नवीन माध्यम घेते त्या माध्यमालाचा त्या काळाचा न्यू मीडिया असे म्हटले जाते.
गीतांजली राणे-घोलप – 9594063760