साखर कारखाने विक्रीत घोळ!

0

मुंबई । राज्यातील साखर कारखाने बंद व विक्रीत अनेक घोळ असल्याचे आरोप लागत आहे.ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शरद पवार याच्या विरूध्द उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी त्याच पावलावर पाऊल ठेवत मुंबई उच्च न्यायलयात याचिका दाखल केली आहे. राज्यातील 10 हजार कोटी रूपयाचे साखर कारखाने अवघ्या एक हजार कोटी रूपयांमध्ये विकल्याचा आरोप या याचिकेत त्यांनी लावला आहे. साखर कारखान्यांच्या विक्रीसंदर्भात खासदार राजू शेट्टी यांनी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. साखर कारखान्याच्या विक्रीत सर्वपक्षीय नेत्यांनी लूट केली असून जनतेच्या तिजोरीवर दरोडा टाकणा-या दरोडेखोरांना आता सोडणार नाही असा इशारा दिला आहे. मित्रपक्ष असो किंवा विरोधी पक्षातील असो, कोणाचाही गय करणार नाही असे त्यांनी सांगितले.

स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीत राहणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी राजू शेट्टी म्हणाले, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा आमच्या पक्षाला फायदा झाला नव्हता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत महायुतीबाबत कार्यकर्ते उत्सुक नाहीत. कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

पवारांवर घोटाळ्याचा आरोप
काही दिवसांपूर्वी अण्णा हजारेंनीदेखील साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी साखर कारखाना आणि सहकार घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता. मात्र त्याबाबतची तक्रार संबंधित यंत्रणेकडे केलीच नाही. उच्च न्यायालयानेही नेमके या मुद्दयावर बोट ठेवत घोटाळ्याची तक्रार दाखल न करताच थेट जनहित याचिका करण्यात आल्याने या याचिकेवर सुनावणी घेतली जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट केले होते.

मी साखर कारखाना खरेदीतील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्र्यांपासून ते सक्तवसुली संचालनालयाकडे तक्रार दाखल केली. पण योग्य हालचाली होत नसल्याने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.
– खा.राजू शेट्टी, स्वाभीमानी शेतकरी संघटना