बसचालकास मारहाण केल्याने ‘चक्का जाम’

0

मुक्ताईनगर । अंतुर्ली फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ बससमोर मोटारसायकल आडवी करुन मुक्ताईनगर- अंतुर्ली बसवरील चालकास मारहाण केल्याची घटना बुधवार 18 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुक्ताईनगर बसस्थानकात महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेमार्फत चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले यामुळे शाळा- महाविद्यालयात जाणार्‍या विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी लागलीच बस आगारात धाव घेवून कर्मचार्‍यांची समजुत घातल्याने त्यांच्या मध्यस्थीने तिढा सुटून तब्बल दोन तासानंतर बससेवा सुरळीत करण्यात आली. मुक्ताईनगर – अंतुर्ली ही सकाळची बस दोन मिनिट अगोदर अंतर्लीहून निघाल्याने याचा राग येवून भोकरी येथील सुनिल जगन्नाथ चौधरी याने बसमागे मोटारसायकलीने पाठलाग करुन अंतुर्ली फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ बससमोर मोटार सायकल आडवी लावून बसचालक व्ही.व्ही.बडगुजर यांना माराहाण केली यात चालक बडगुजर यांच्या हाताला व छातीला मारहाण केली यात चालकास हाताला व छातील जबर मार लागला आहे.

प्रवाशांचा बस कर्मचार्‍यांवर संताप
सदर घटनेची माहिती चालक बडगुजर यांनी मुक्ताईनगर आगारातील कर्मचार्‍यांना सांगितल्यावर मुक्ताईनगर बसस्थानकात लांब पल्ल्याच्या व तालुक्यातील बसेस थांबवून तब्बल दोन तासापर्यंत कोणतीही बस सेवा न मिळाल्याने प्रवाशांचे तसेच विद्यार्थ्यांचे हाल पडले. कामगार संघटनेच्या कर्मचार्‍यांनी कोणत्याच प्रकारचे काम करण्यास नकार दिल्याने पास धारकांचीही चांगलीच कुंचबना झाली. लांब पल्ल्याच्या बसेस का सोडत नाही म्हणून प्रवासी व बस कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. तुमच्या वैयक्तिक वादामुळे प्रवाशांचे हाल करु नका या कारणावरुन प्रवाशी कर्मचार्‍यांवर संतापले परंतु कर्मचार्‍यांनी सांगितले की, वेळोवेळी बस चालकावर अन्यायय होतो. मारहाणीचे प्रकार घडतात या कारणासाठी आम्ही आंदोलन करीत असल्याचे एस.टी.
कर्मचार्‍यांनी सांगितले.

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीसात तक्रार
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी बसस्थानक गाठून कर्मचार्‍यांशी संवाद साधला. वैयक्तिक वादातून चक्का जाम करु नका, एखाद्या छोट्या घटनेने प्रवाशांना वेठीस धरु नका संबंधितांवर गुन्हा दाखल करा. विनाकारण प्रवाशांचे हाल करु नका यामुळे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेऊन चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेऊन बस सेवा सुरळीत करण्यात आली. व चालकास मारहाण करणार्‍या इसमावर गुन्हा दाखल होण्यासाठी पोलीसात तक्रार देण्यात आली. याप्रसंगी शिवसेना तालुका अध्यक्ष छोटू भोई, दिलीप पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते. सदर घटनेची दखल पोलीसांनी तात्काळ घेवून बसचालकास मारहाण करणार्‍या इसमास त्वरीत अटक करावी असे निवेदन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेतर्फे मुक्ताईनगर पोलीसात देण्यात आले. या निवेदनावर आगार अध्यक्ष पी.ए.मोरे, बी.आर.खान यांसह कर्मचार्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.