चाळीसगाव । शेतीवर वारस लावून खातेफोड करण्यासाठी 50 हजाराची लाच मागणार्या तालुक्यातील कळमडू येथील तलाठ्यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून बुधवारी 18 जानेवारी 2017 रोजी दुपारी रंगेहात ताब्यात घेतले असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील राजमाने शिवारात तक्रारदाराच्या पंजोबांना शासनाकडून शेती मिळाली होती. सदर शेती वारस हक्काने त्यांचे चुलत काका व चुलत भाऊ यांचे नावावर झाल्याने त्या शेतीवर तक्रारदार व त्यांचे भाऊ चुलत भाऊ व बहीण यांना वारस लावून खातेफोड करण्यासाठी तक्रारदार यांनी तालुक्यातील कळमडू येथील स.जा. वर्ग 3 चे तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे यांना 8 जानेवारी 2017 रोजी अर्ज केला होता. त्यानंतर 10 जानेवारी रोजी त्यांना भेटले असता, त्यांनी तुमचे प्रकरण जुने आहे. त्यासाठी तुम्हाला 60 हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांचेकडे तक्रार केल्यानंतर 17 जानेवारी 2017 रोजी पडताळणी दरम्यान तलाठी ज्ञानेश्वर काळे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून 50 हजाराची मागणी करून 18 रोजी 10 हजार रूपये आणून देणेबाबत सांगितल्याने 18 जानेवारी 2017 रोजी दुपारी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधिक्षक सुनिल गांगुर्डे व त्यांच्या पथकातील हवालदार जितेंद्रसिंग परदेशी, किरण साळी, पोलीस नाईक देवेंद्र येंदे, संदीप सरग, कैलास शिरसाठ, कृष्णकांत वाडीले, सुधीर सोनवणे, मनोहर ठाकूर, कैलास जोहरे, प्रकाश सोनार, सतिष जावरे, प्रशांत चौधरी, संदीप कदम यांनी सापळा रचून तलाठी ज्ञानेश्वर सुर्यभान काळे यांना 10 हजार रूपयाची लाच घेतांना पंचासमक्ष रंगेहात ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सदर तलाठी यांचे विरोधात चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.