दोन दिवसांनी मिळणार सार्वजनिक बांधकाम विभागाचे पत्र
जळगाव: शहरातील विकासकामांसाठी आलेल्या 42 कोटींच्या कामाची वर्क ऑर्डर मक्तेदाराला देण्यात आली असून मनपाने आपल्या हिश्शाची रक्कम देखील स्वतंत्र खात्यात वर्ग केली आहे. दरम्यान, संपूर्ण कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व जळगाव महानगरपालिकेचे संयुक्त खाते उघडणे आवश्यक आहे. मनपाने संयुक्त खात्यात निधी वर्ग करण्यासाठी आवश्यक पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने द्यावे यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची भेट घेतली.
जळगाव शहरातील विकासकामांसाठी सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत 42 कोटींची कामे मंजूर करण्यात आली होती. काही तांत्रिक कारणास्तव कामांना स्थगिती देण्यात आली होती. गेल्या आठवड्यात सर्व कामांची स्थगिती हटवून मक्तेदाराला कार्यादेश देण्यात आले आहेत. कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जळगाव मनपाचे स्वतंत्र संयुक्त बँक खाते उघडणे आवश्यक आहे. मनपाच्या हिश्शाचा निधी संयुक्तिक खात्यात वर्ग करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने मनपा प्रशासनाला पत्र देणे आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांची भेट घेत महापौर भारती सोनवणे व नगरसेवकांनी त्यांना विनंती केली. दोन दिवसात दि.22 रोजी दुपारी 4 वाजता पत्र देण्याचे आश्वासन अधिकार्यांनी शिष्टमंडळाला दिले.
यांची होती उपस्थिती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात महापौर भारती सोनवणे यांच्यासह उपमहापौर सुनील खडके, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, नगरसेवक कैलास सोनवणे, नवनाथ दारकुंडे, अमित काळे, अॅड. दिलीप पोकळे, कुलभूषण पाटील, किशोर बाविस्कर, चेतन सनकत, अतुलसिंग हाडा, मनोज काळे, भरत सपकाळे, कुंदन काळे आदी उपस्थित होते.