बारामती । बारामती नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर गेल्या 42 दिवसांपासून सुरू असलेले उपोषण अखेर सोमवारी संपले. माळेगाव कारखान्याचे जेष्ठ नेते व सहकारतज्ज्ञ चंदरअण्णा तावरे यांच्या हस्ते नाना सातव यांना सरबत देण्यात आला. बारामती तालुक्यातील प्रदिर्घ काळ चाललेले हे उपोषण ठरले आहे.
जामदार रोडवरील रहिवाशांच्या रस्त्यासंदर्भात हे उपोषण सुरू होते. नगरपालिकेेने निविदा काढून निविदेची प्रक्रिया पुर्ण केली. आठ दिवसांपूर्वी सदरचे काम अनिल देशमुख या ठेकेदाराला देण्यात आले होते. मात्र, कामाचे वर्क ऑर्डर (प्रारंभ प्रमाणपत्र) मिळाली नव्हती. परंतु प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार, असा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी केला होता. प्रदिर्घ काळ रेंगाळलेले हे काम कोणत्याही परिस्थितीत यंदा सुरूच करायचे, असा निर्धार करूनच हे उपोषण सुरू करण्यात आले होते.
रस्त्याची मागणी
जामदार रोड रहिवाशांच्या मुलभूत सुविधांच्या मागणीसाठी हे उपोषण करण्यात आले. नगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषण सुरू असल्याकारणाने जिल्ह्याबाहेरून येणार्या नागरिकांना चर्चेचा व कुतुहलाचा विषय होता. बारामती नगरपालिकेने विनाकारण प्रतिष्ठेचा केलेला हा विषय नागरिकांमध्ये चांगलाच चर्चेला गेला.
कामाचा शुभारंभ
सकाळी 10 वाजता जामदार रोडच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ माळेगाव कारखान्याचे जेष्ठ नेते व सहकारतज्ज्ञ चंदरअण्णा तावरे, कारखान्याचे अध्यक्ष रंजनकाका तावरे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी विद्यमान जेष्ठ नगरसेवक अशोक काका देशमुख, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे, दिलीप आप्पा खैरे, विरोधी पक्षनेते सुनिल सस्ते, विष्णुपंत बापु चौधर, जयसिंग देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.
न्याय देण्याचे आश्वासन
या भागात 110 दहा कुटुंबे राहत असून ढवाणवस्ती, मोरयानगर, जामदार रोड, या भागाचा यात समावेश आहे. रस्त्यावर मोठाले खड्डे हा तर चर्चेचा विषय होता. आता या कामामुळे नागरिक समाधानी आहेत. नागरिकांनी फटाके वाजवून उपोषणाची सांगता केली. यापुढील काळात नगरपालिकेकडून जिथे जिथे अन्याय होईल, त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल. नागरिकांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासने नाना सातव यांनी यावेळी दिले. यावेळी माळेगाव कारखान्याचे संचालक अविनाश गोफणे, दिलीप शिंदे, सुनिल सस्ते, राजेंद्र ढवाण यांची भाषणे झाली. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष सुनिल पोटे, शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढवाण, अजित बापु साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.