पहिली इंडिया पोस्ट पेमेंट बँक

0

औरंगाबाद । राष्ट्रीयीकृत बँक खेड्यापर्यत जाण्यास उदासीनता दिसून येत आहे.त्यामुळे खेड्यापर्यंत बँकेची सेवा पोहोचली नाही. बँकीग क्षेत्राला खेड्यापर्यंत नेण्यासाठी नव्याने यंत्रणा न उभी करता. खेड्यापर्यंत पोहचलेले पोस्ट खात्याची रचना बदलत आहे. नवनवीन योजना आणून काळाप्रमाणे बदलण्याच्या शर्यतीत डाकघरही मागे नसून बँकिंगच्या क्षेत्रातही उतरत आहे. महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पहिली इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) औरंगाबादेतून सुरू होणार आहे.अनेक शेतकर्‍यांना गावात बँक नसल्यामुळे शहर किंवा नजीकच्या मोठया गावात पदरमोड करून जावे लागते. पहिली बँक सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने खेडयापर्यंत जाळे विस्तारण्यात येणार असल्याची माहिती क्षेत्रीय कार्यालयाकडून देण्यात आली.एटीएम एसबीआय ग्रुपमध्ये सध्या सुरू असलेल्या पोस्टाच्या सेवेतील एटीएम सुरू झालेले आहेत. मात्र ते एटीएम केवळ पोस्टात चालत होते. आता पोस्टाचे एटीएम हे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बँकांमध्येही चालू शकणार आहे. 1 जानेवारीपासून ही सेवा सुरू झालेली आहे.

खेडयापर्यंत जाण्याची उदासीनता
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय योजना किंवा नवीन प्रयोग राबवण्यासाठी आवश्यक तेथे भारतीय पोस्टाची मदत घ्यावी, अशा सूचना केलेल्या आहेत. भारतात आजही हजारो खेडयांपर्यंत बँकेची सेवा पोहोचली नाही. अनेक राष्ट्रीयीकृत बँकांची खेडयापर्यंत जाण्याची उदासीनता दिसून आलेली आहे. बँकिंग क्षेत्राला खेडयापर्यंत नेण्यासाठी नव्याने यंत्रणा उभी करायची गरज नसून तेथील डाकघरे कामी येतील, या उद्देशाने सरकारकडून इंडिया पोस्ट पेमेंट बँक सुरू करण्यात येत आहे.

बँकिंगसंदर्भातील जवळपास सर्वच व्यवहार होणार
औरंगाबाद येथील पोस्टाच्या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत मराठवाडयातील आठ व नाशिक, नंदूरबार, धुळे व जळगाव हे बारा जिल्हे येतात. या बारा जिल्ह्यांतून औरंगाबाद शहरात बँक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बँकेतून कर्ज वितरण व्यवस्था सोडून बँकिंगसंदर्भातील जवळपास सर्वच व्यवहार होणार आहेत. अनबँक्ड क्षेत्रापर्यंत म्हणजे जिथे बँक पोहोचली नाही, अशा खेडयापर्यंत जाळे विस्तारणे, असा यामागचा उद्देश असल्याचे येथील क्षेत्रीय कार्यालयाकडून सांगण्यात आले.