पिंपरी-चिंचवड : मूर्ती प्रकरणात राष्ट्रवादीला मिळालेली क्लिन चिट व समाविष्ट गावाच्या विकसकाच्या नावावर 425 कोटीच्या कामातील कोट्यवधींचा भ्रष्टाचार यामुळे भाजपाचे शहरवासीयांसमोर पितळ उघडे पडले आहे. भ्रष्टाचार पचवण्यासाठी व आपण उघडे पडू या भितीपोटी आमदार लक्ष्मण जगताप हे राष्ट्रवादीने समाविष्ट गावाकडे दुर्लक्ष केल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहेत. पण समाविष्ट गावामध्ये राष्ट्रवादीने या रकमेच्या चौपट निधी खर्च केला आहे. हे त्यांनी डोळे उघडे ठेवून नीट तपासून पहावे, असा पलटवार राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केला आहे.
समाविष्ट गावाला प्रत्यक्षात किती निधी? याचा खुलासा करावा
वाघेरे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, समाविष्ट गावाला 425 कोटी रुपयांचा निधी दिल्याची शहरभर बोंबाबोंब केली जात आहे; पण प्रत्यक्षात यातील किती निधी या समाविष्ट गावांना दिला जाणार आहे याचा स्पष्ट खुलासा जगताप यांनी या समाविष्ट गावातील नागरींकाना करुन द्यावा. तसेच या भागातील किती रस्ते पालिकेच्या ताब्यात आहेत याचीही माहिती द्यावी. स्मार्ट सिटीच्या समावेशा बाबत व्होट बँकेसाठी भाजपाने केले राजकारण व त्यानंतर देखील स्मार्ट सिटीत प्रवेश होऊनही किती निधी शहराला मिळाला याचाही खुलासा प्रामाणिकपणे जगताप यांनी शहरवासीया पुढे करावा. पवनाथडी जत्रे बाबत करदात्यांच्या पैसे वाचवल्याचे सांगणार्यांनी 425 कोटींच्या टेंडरमध्ये कोटयावधीं रूपयांचा भ्रष्टाचार केला. आज बचत गटाच्या हक्काच्या या जत्रेबाबत शंका घेऊन अनेक महिलांच्या आनंदावर विरजण घालण्याचे काम भाजपा सत्ताधार्यांनी केले आहे. या बाबत महिला मध्ये तीव्र संताप आहे.
बांधकाम व्यवसायातील मंदीमुळे नवीन दुकानदारी
बांधकाम व्यवसायाला आलेल्या मंदीमुळे आमदार जगतापांनी बहुतेक नवीन दुकानदारी सुरु केल्याचे दिसत असल्यामुळे आपली दुकानदारी झाकण्यासाठी नैराश्यातून माझ्यावरच दुकानदारीचे आरोप केले जात आहेत, ही मोठी हास्यापद बाब आहे. समाविष्ट गावाबाबत राष्ट्रवादीने निधीबाबत नेहमीच झुकते माप दिले आहे. त्यामुळेच आळंदी रस्त्याचे सहापदरीकरण, थरमॅक्स चौकातील संतशिल्प, चर्होली गावातील मैलाशुध्दीकरण प्रकल्प, आळंदी ते देहुगावा रस्ता, भोसरीतील देशातील सुसज्ज कुस्ती केंद्र, उद्याने, चिखलीमधील अनेक उद्याने, रस्ते यांचा हजारो कोटी रुपयांचा निधी देऊन विकास केला आहे. पण भाजपाने 425 कोटी रुपये समाविष्ट गावासाठी दिल्याचे सांगितले जात आहे. यात देखील जगताप यांनी खोटारडे पणा केला असून यातील 105 कोटी 21 लाख रुपये निधी आपल्या मतदार संघात वळवला आहे. हा देखील समाविष्ट गावावर मोठा अन्यायच आहे.
आमदारकी वाचविण्यासाठीची तयारी
ज्या ज्यावेळी समाविष्ट गावातील आरक्षणे ताब्यात आली त्यात्या वेळी त्यासाठी राष्ट्रवादीने निधी मंजूर केला आहे. हे देखील जगताप यांनी तपासुन पहावे, असे वाघेरे यांनी आपल्या पत्रकात सुचवले आहे. गुजरातच्या निवडणुकीत भाजपाची ताकद कमी झाल्यामुळे येथील निवडणुकीवर देखील त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे आपली खुर्ची वाचवण्यासाठी पुन्हा महानगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान नागरीकांची ज्या पध्दतीने दिशाभुल व फसवणूक करुन सत्ता काबीज केली. त्याच पध्दतीने पुन्हा आमदारकी वाचविण्याची तयारी जगताप यांनी आत्तापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी करायचे एक आणि दाखवायचे एक हे तंत्र आवलंबले आहे. असे वाघेरे यांनी म्हटले आहे.