425 कोटींवरुन महासभेत आरोप-प्रत्यारोप

0

विकासकामांना विरोध नाही प्रवृत्तीला विरोध; राष्ट्रवादीचा पवित्रा

पिंपरी : समाविष्ट गावातील 425 कोटींच्या रस्ते विकासाच्या कामात अनियमितता झाली. त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. विकासकामांना आमचा विरोध नसून कामाच्या प्रवृत्तीला विरोध आहे, असा हल्लाबोल विरोधकांनी सत्ताधार्‍यांवर केला. तर, सत्ताधार्‍यांनी विरोधकांच्या गैरव्यहाराचा पाढा वाचून दाखविला. महासभेत 425 कोटींवरुन विरोधक आणि सत्ताधार्‍यांमध्ये आरोप-प्रत्यारोप फैरी झडल्या.

आयुक्त करतात वकिली
विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी विविध कामांतील रिंग प्रकरणी आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीचा मुद्दा मांडला. तक्रारीवर आयुक्त मोघम उत्तरे देऊन प्रशासन सत्ताधार्‍यांची ‘वकिली’ करीत आहेत. 425 कोटींच्या कामात पूर्वी कमी दराने काम करणार्‍या12 ठेकेदारांची जादा दराने निविदा मंजूर केली आहे. त्यामुळे टक्केवारीसोबत भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी पालिकेवर दरोडा टाकत असून पालिकेला भ्रष्टाचाराचे ग्रहण लागले आहे. आयुक्तांसह सर्वच अधिकार्‍यांनी कोणत्याही शेरा न मारता फाईलीवर तत्परतेने सह्या केल्या. कामास विरोध नसून, वाईट पद्धतीने होणार्‍या कामास राष्ट्रवादीचा विरोध आहे. सत्ताधार्‍यांनी टक्केवारीतून ‘कामच’ दाखविले आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच आयुक्तांनी गैरप्रकार थांबविणे गरजेचे आहे.

राजेश लांडे म्हणजे बोका : बहल यांचा आरोप
तत्कालीन आयुक्त राजीव जाधव हे कमी दरात काम करू शकतात, तर श्रावण हर्डीकरांना हे काम जमत नाही. मुख्य लेखापाल राजेश लांडे हे ‘बोका’ असून, टक्केवारी वाढावी म्हणून ठेकेदारांच्या फाईल पाच – पाच वेळा फिरत आहे, असा आरोप बहल यांनी केला. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी तक्रार केल्याने वाकड सीमा भिंतीतील सर्व निविदा उघडून 42 लाखांची बचत झाली. तशी भूमिका या निविदेमध्ये आयुक्तांनी घेतली नसल्याचा आरोपही बहल यांनी केला.

भरमसाठ खर्चाची घाई का
राष्ट्रवादीचे दत्ता साने म्हणाले की, ग्रामीण भागात राष्ट्रवादीने काहीच काम केले नाही, असे चुकीचे सत्ताधार्‍यांकडून सांगितले जात आहे. समाविष्ट गावात 425 कोटींचे रस्ते काम करणार म्हणून भाजपाने फलकबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. नियमानुसार 80 टक्के जागा ताब्यात नसताना निविदा काढली. टीडीआर आणि एफएसआय नसताना हा ठिकाणी भरमसाठ खर्च करण्याची घाई का केली गेली. त्यात घोळ झाला आहे. यातील भ्रष्टाचार काढण्याचा मी प्रयत्न करत आहे. चिखली-आकुर्डी दरम्याची जागा देखील ताब्यात नाही.

आर्थिक नुकसान थांबवावे
राष्ट्रवादीचे अजित गव्हाणे म्हणाले की, 425 कोटींच्या निविदा पारदर्शकपणे काढल्या नाहीत, अशी सर्वांची तक्रार होती. त्याची खोलात जाऊन सखोल चौकशी करावी. जादा दराने निविदा असल्यास त्या कमी कराव्यात. पालिकेचे आर्थिक नुकसान थांबवावे.

पुराव्यासह तक्रार करा
स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी राष्ट्रवादीच्या मागील काळातील अनेक निविदा 30 ते 70 टक्के जादा दराने दिल्या गेल्याचा आरोप केला. त्यांनी राष्ट्रवादीच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या कार्यकाळातील वाढीव दराने मंजुरी दिलेल्या कामांची यादीच सभागृहासमोर मांडली. 425 कोटींच्या कामांची पुराव्यासह तक्रार करावी अन्यथा राजकारण सोडावे, असा आव्हान त्यांनी विरोधकांना दिले.