आपण लोकशाही स्वीकारली असली, तरी ती यशस्वीपणे राबवण्याएवढी निष्ठा मात्र आपण आपल्यामध्ये निर्माण केलेली नाही. या लोकशाहीला दळभद्री म्हणणार्या ठोकशाही वृत्तीच्या लोकांना आणि लोकांना विकत घेऊन ही लोकशाही आपल्या खिशात घालणार्या सर्वभक्षक स्वार्थांधांना आपण हवा तो उत्पात घालू देण्याइतपत निष्क्रियता स्वीकारली आहे. या शक्तिंविरुद्ध झुंजायची आपली ताकद जरूर आहे, पण इच्छा मात्र दिसत नाही. ही इच्छा जागृत व्हायला हवी. इच्छाशक्तीचे बळ अफाट असते.आपण जर ही लोकशाही स्वच्छ, समर्थ करायचे ठरवले, तर आपला रुपय्या ठणठणीत वाजेल, नाहीतर पदरात पडेल ते नाणे आपल्याला चालवून घ्यावे लागेल.
नगरपालिकांच्या निवडणुकांपाठोपाठ महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. मुंबई-पुण्याचीही निवडणूक नव्या वर्षात होणार आहे. महापालिकेची निवडणूक ही विधानसभेच्या निवडणुकीपेक्षादेखील महत्त्वाची आहे. आमदारकीपेक्षा नगरसेवकपद अधिक ‘मोलाचे’ आहे. एकप्रकारे नगरसेवकपदही रोज सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे. म्हणून तर आमदार म्हणून निवडून आल्यानंतरही अनेकजण आपल्या नगरसेवकपदाचा त्याग करीत नाहीत. सेवेसाठी ही मंडळी तळमळत असतात. आमदारकीत सेवा थोडी, नगरसेवकपदात सेवाच सेवा! भागातला प्रत्येक रस्ता, प्रत्येक गटार, प्रत्येक दुकान, प्रत्येक मकान, प्रत्येक गाडा, प्रत्येक फेरीवाला आणि प्रत्येक झोपडीवाला ही जणू सेवाकेंद्रेच!
नगरसेवकांची कर्तबगारी जोखायची असेल, तर डोळे उघडे ठेवून आपल्या भागात फिरा, बेकायदा बांधकामे बघा, फुटपाथवर संसार मांडणारे बघा, फेेरीवाल्यांचे तांडे बघा, हॉटेल-बारवाल्याने व्यापलेला पसारा बघा, या प्रत्येकाची नगरसेवकाने सेवा केलीय, हे लक्षात घ्या. फुटपाथवरचा झोपडपट्टीवाला, फेरीवाला हा नगरसेवकाचाच पोटभाडेकरू असतो, असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही. पोलिसांचा हप्ता जसा ठरलेला असतो, तसाच नगरसेवकांचाही असतो. महापालिकेच्या समित्यांवर तुम्ही आलात तर ‘भगवान तुम्हाला छप्पर फाडके देतो’ म्हणजे काय, याचा अर्थ कळेल! या समित्यांच्या बैठकींच्या वेळी बाहेर बॅगा भरून गरजू माणसे उभी असतात. मतदानापूर्वी त्यांच्या बॅगा रिकाम्या होतात आणि त्यांना हवे असणारे निर्णय ‘सेवाभावी’ नगरसेवक बहुमताने घेतात. विरोध करणारे ऐनवेळी काम निघाले म्हणून बैठकीतून मतदानापूर्वी बाहेर निघून जातात. अथवा मतदान झाल्यावर उशिरा येतात. महत्त्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद पुन्हा पुन्हा एखाद्याच माणसाकडे जाते तेव्हा अर्थातच त्याचा ‘समृद्ध अनुभव’ हेच कारण असते. असे समृद्ध अनुभवी विधानसभेच्या वा लोकसभेच्या निवडणुकीत जेव्हा उभे राहतात, तेव्हा मतदारांना धनाढ्याच्या लग्नातला सोहळा अनुभवायला मिळतो.
या निवडणुकीत उमेदवार्या मिळवताना अनेकांनी जीवनमरणाची लढाई करण्याएवढा आटापिटा का केला? झुंडीने कार्यकर्ते आणून आपले कार्य नेत्यांच्या मनावर बिंबवण्याची धडपड का केली? नेते केवढे चाणाक्ष! त्यांना वॉर्डातल्या कार्यकर्त्यांना ज्यांची कर्तबगारी कधी दिसली नाही, अशी झाकली माणके कशी चटपट दिसली? कोण महापालिका गाजवणार याचा साक्षात्कार नेत्यांना झाला. उमेदवारांचे व्यक्तिमत्त्व नेत्यांनी जाणले आणि नेत्यांचा आशीर्वाद लाभला ‘की जय’ म्हणणारच, हे उमेदवारांनी जाणलं. यामुळे थोडी नाराजी, थोडी खळखळ होते, पण ‘ठणठणीत रुपय्ये’ हातात असले की, सगळी नाराजी संपवता येते. उमेदवारी मिळणे ही सर्वात मोठी गोष्ट. वाट्टेल ते करून ती मिळवायची अशा निर्धारानेच अनेकजण लढतीत उभे असतात. पोटाला पिस्तूल टेकवण्यापर्यंत काहींना आक्रस्ताळे व्हावे लागते. काहींना ‘ठणठणीत रुपय्या’ हीच यशाची गुरुकिल्ली आहे हे ठावूक होते. त्यांना वाजवून उमेदवारी मिळवता येते. आपल्या पाच वर्षांतल्या कर्तबगारीचे रांजण पक्षातल्या कार्यकर्त्यांनी नेत्यांपुढे टाकले-ओतले. पण, त्याची फारशी दखल घेतली जात नाही. ‘सेवे’साठी घराघरांत पोहोचलेल्यांना पुन्हा सेवेची संधी दिली जाते. त्यांच्याविरुद्ध व्यक्त केलेला तळतळाट ‘ठणठणीत रुपय्या’च्या आवाजात विरून जातो, अशी खंत सर्वच पक्षांतून ऐकू येते.
या लोकशाहीला दळभद्री म्हणणार्या ठोकशाही वृत्तीच्या लोकांना आणि लोकांना विकत घेऊन ही लोकशाही आपल्या खिशात घालणार्या सर्वभक्षक स्वार्थांधांना आपण हवा तो उत्पात घालू देण्याइतपत निष्क्रियता स्वीकारली आहे. या शक्तिंविरुद्ध झुंजायची आपली ताकद जरूर आहे, पण इच्छा मात्र दिसत नाही. ही इच्छा जागृत व्हायला हवी. इच्छाशक्तीचे बळ अफाट असते. आपण जर ही लोकशाही स्वच्छ, समर्थ करायचे ठरवले तर आपला रुपय्या ठणठणीत वाजेल, नाहीतर पदरात पडेल ते नाणे आपल्याला चालवून घ्यावे लागेल. महापालिकेतल्या सेवाभावी नगरसेवकांचा भरपूर अनुभव घेतलेल्या एका अधिकार्याने आपली एक फार चांगली सूचना माझ्याशी बोलताना केलीय् ः ‘कमीत कमी वाईट असणार्याला निवडा.’ या अधिकार्यानं जे सांगितलंय तेवढं करायचं जरी आपण म्हणजे सर्व सुशिक्षितांनी ठरवलं तरी राजकारणाचं गटार बरचसं साफ होईल. पुण्यात काही वर्षांपूर्वी ‘सकाळ’चे ना. भी. परुळेकर यांनी पुढाकार घेऊन नागरी संघटना निर्माण केली होती. बरीच चांगली माणसे तेव्हा, पुण्यात निवडून गेली होती. पण ही नागरी आघाडीही राजकीय पक्षांच्या ‘ठणठणीत रुपय्यां’नी खाऊन टाकली. जिथे नीती नाही तिथे धर्म नाही. ही गोष्ट कुणी सांगायची? नुसते झेंडे लावून सुराज्य येत नाही. सुराज्यासाठी नीतीची चाड असणार्या निष्ठावंतांची गरज असते. त्यांची फौज लागते.
– हरीश केंची
9422310609