परदेशी जाणार्‍या भारतीय खेळाडूंसाठी हेल्पलाइन करा

0

नवी दिल्ली । नागपुरची कांचनमाला पांडे आणि तिच्यासोबत असलेल्या पाच पॅरा जलतरणपटूंवर बर्लिनमध्ये ओढावलेल्या लाजिरवाण्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, परदेशात जाणार्‍या भारतीय खेळाडूंसाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी ऑलिम्पिक पदक विजेत्या अभिनव बिंद्राने क्रीडा मंत्रालयाकडे केली आहे. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने मंजूर केलेला निधी वेळेवर उपलद्ध न झाल्यामुळे कांचनमाला आणि तिच्या इतर सहकार्‍यांना हॉटेल आणि खाण्याचे बिल देण्यासाठी इतरांकडे हात पसरावा लागला होता. त्यावेळी अभिनवने स्वत: सदस्य असलेल्या फाऊंडेशमार्फत या जलतरणपटूंना तातडीने शिष्यवृत्ती उपलब्ध करून दिली होती. बर्लिनमधील घटना उघडकीस आल्यावर अभिनव बिंद्राने तत्काळ ट्वीट करून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्याने पंतप्रधान नरेेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री विजय गोयल यांना ट्वीट करून याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली होती.

अभिनव बिंद्राने क्रीडा मंत्री विजय गोयल यांना एक ट्वीट केले आहे. त्यात त्याने परदेशात विविध स्पर्धांमध्ये खेळायला जाणार्‍या खेळाडूंच्या मदतीसाठी हेल्पलाइन नंबर आणि आपत्कालीन निधी उभारण्याचे मागणी केली आहे. जेणेकरून परदेश दौर्‍यात काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांना मदत मागता येईल.