नवी दिल्ली । कुणाला मानवंदना किंवा आदरांजली द्यायची झाली तर बहुतेक लोक हे दोन मिनिटे मौन बाळगून ती देतात. तशी प्रथा अनेक वर्षांपासून आहे. मात्र, देशासाठी सीमेवर आपले रक्त वाहणार्या शहीद जवानांना सलाम करण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी एका निवत्ता लष्करी अधिकार्याने एक वेगळाच मार्ग निवडला. लष्करी अधिकार्याच्या या वेगळ्या सलामालाही सलाम केला जात आहे.
सोमनाथ झा असे या 58 वर्षीय निवृत्त मेजर जनरल अधिकार्यांचे नाव असून त्यांनी देशाचे रक्षण करणार्या शहीद जवानांना सलाम करण्यासाठी प्रत्येक शहिदासाठी दोन मिनिटे, यानुसार तब्बल 43 हजार 582 मिनिटे सायकल चालवून यांनी 21 हजारहून अधिक शहिदांना श्रद्धांजली वाहिली आहे, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अशाच पद्धतीची श्रद्धांजली यात्रा 2018 मध्येही करण्याचा सोमनाथ झा यांचा मानस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत 21 हजारहून अधिक जवानांनी देशासाठी प्राण समर्पित केलेत. तब्बल 37 वर्षं लष्करी सेवेत कार्यरत असलेल्या सोमनाथ झा यांचे अनेक सहकारीही भारतमातेसाठी हसत हसत शहीद झाले. त्यांच्या बलिदानाचं मोल झा चांगलेच जाणतात. म्हणूनच, या शहिदांना आपल्या वतीने सलाम करायचे त्यांनी ठरवले होते.
त्यानुसार, निवृत्तीनंतर 18 दिवसांनी – म्हणजेच गेल्या वर्षी 19 ऑक्टोबरला ते आणि त्यांची पत्नी सायकलवरून निघाले आणि त्यांनी 183 दिवसांत 29 राज्यांमधून 12 हजार किमीचा प्रवास केला. तब्बल 43,582 मिनिटे त्यांनी सायकल चालवली आणि शेवटी दिल्लीच्या अमर जवान ज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना मानवंदना दिली.