डिजिटल इंडियाच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रसुध्दा डिजिटल होत चालला असून, या डिजिटल युगामध्ये मानवी संवेदनांच भान ठेवणे गरजेचे आहे. या संवेदना कायम ठेवून एकमेकांना सहकार्य केल्यास आपला महाराष्ट्र डिजिटल महाराष्ट्राच्या क्षेत्रात नक्कीच आदर्श निर्माण करेल. डिजिटलच्या युगामध्ये अधिक पारदर्शकता आणि गतिमानता आहे. आज सारे जग ऑनलाइनकडे वळताना दिसत आहे. ग्राहकांचा कलदेखील डिजिटल विश्वाकडे वाढत चालला आहे. आता प्रत्येकालाच काळाशी सुसंगत पावले टाकावी लागणार आहेत. असो. डिजिटल युगाचा प्रसार झाला तसा फ्लॉपी डिस्क, सीडी, डीव्हीडी असं स्थित्यंतर पाहायला मिळालं. परंतु, या सर्वापेक्षा अधिक उपयुक्त असं उपकरण म्हणजे हार्डडिस्क. कॅसेट टेपपेक्षा हार्डडिस्क काही वेगळी नाही. दोन्हीमध्ये मॅग्नेटिक रेकॉर्डिंग तंत्राचा वापर केलेला असतो. मॅग्नेटिक मीडियम हे सहजरित्या डीलीट किंवा रीराइट केले जाऊ शकते. तसेच त्यामध्ये स्टोअर केलेली माहिती कित्येक वर्ष तशीच व्यवस्थितपणे राहू शकते. फ्लॉपी डिस्क ते हार्डडिस्कपर्यंत सगळ्याच उपकरणांमध्ये हेच तंत्र वापरले गेले आहे. तंत्रज्ञान विकसित होत गेले तसतशी प्लॅटरवर स्टोअर होणार्या डेटाची मर्यादा वाढत गेली. हजार स्क्वेअरफूट जागेवर चार मजली इमारत आणि तितक्याच जागेवर दहा मजली इमारत, यात जो फरक आहे तोच फरक हार्डडिस्कमधल्या या जागेत आहे. अर्थात आपल्या संगणकाची साठवणुकीची किती क्षमता आहे? हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दुसरी बाब म्हणजे हार्डडिस्क किंवा हार्डडिस्कची साठवणूक क्षमता ही बाब जितकी महत्त्वाची आहे तितकाच ऑपरेटिंग सिस्टम हा विषय महत्त्वाचा असून तितकाच रंजक आहे. ऑपरेटिंग सिस्टम ही गोष्ट जर या जगात नसती तर कदाचित आपल्यापर्यंत संगणक कधी पोहोचलेच नसते, ते फक्त प्रयोगशाळेत वापरले गेले असते. किंवा शास्त्रज्ञांकडूनच वापरले गेले असते. ऑपरेटिंग सिस्टमचा हा एक प्रकारे टीव्ही रिमोट आहे. असा टीव्ही ज्यावर कोणतेही बटण नाही. आणि हा रिमोट जर हरवला तर आपला महागडा टीव्ही आपल्या काही उपयोगाचा नाही. त्याचप्रमाणे ऑपरेटिंग सिस्टम आहे. आपण कितीही महाग, फास्ट सिपियू आणला, कितीही मोठी हार्डडिस्क आणली, कितीही सुंदर मॉनिटर आणला तरी हे सगळे काही उपयोगाचे नाही जर आपल्याकडे ओएस नाही. हे झाले ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीत…
डेटास्टोअरेज किंवा ज्ञानसाठा महत्त्वाचा…
कुठल्याही प्रकारचा डेटा साठवण्यासाठी विशिष्ट प्रकारची उपकरणे असतात. मुळातच साठवण हे निसर्गाने जीवसृष्टीला बहाल केलेलं वरदान आहे. भविष्याचा विचार करून काही गोष्टींचा साठा करून ठेवायचा हे मुंगीपासून ते मानवापर्यंत सगळ्यांच्याच नसानसांत भिनलेलं आहे. अन्नसाठा असो की इतर जीवनावश्यक वस्तू, व्यवस्थित जपून ठेवणं हे उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचेच ठरत आले आहे. म्हणूनच गुहेपासून ते झाडातल्या ढोलीपर्यंत आणि कागदाच्या फायलींपासून ते हार्डडिस्कमधल्या डेटाफाइल्सपर्यंत साठवणुकीचा प्रवास अद्भूत आहे. अन्नसाठा, शस्त्रसाठा बरोबरच डेटास्टोअरेज किंवा ज्ञानसाठा हा कालानुरूप महत्त्वाचा ठरू लागला.
परंतु, मग कॅसेट्स आणि हार्डडिस्कमध्ये फरक तो काय. कॅसेटच्या बाबतीत मॅग्नेटिक रेकॉर्डिंग मटेरिअलला एका पातळ अशा प्लास्टिक स्ट्रिपचं आवरण असतं. हार्डडिस्कमध्ये मात्र त्यासाठी अॅल्युमिनियम किंवा ग्लास डिस्कचा वापर होतो. टेपमधील डेटा सेव्ह किंवा वापरण्यासाठी डेकमधील हेडरचा टेपला स्पर्श होत असतो. हार्डडिस्कच्या बाबतीत मात्र तसे होत नाही. तंत्रज्ञान विकसित होत गेले तसे टेप मागे पडली आणि तिची जागा हार्डडिस्कने घेतली. हार्डडिस्कचा परफॉर्मन्स मोजण्यासाठी दोन गोष्टी असतात. एक म्हणजे डेटा रेट. एका सेकंदात किती बाइट्स डेटा सीपीयूकडे पाठवला जातो. यावरून हार्डडिस्कचा परफॉर्मन्स ठरतो. हा रेट 5 ते 40 एमबी इतका असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीक टाइम. हा टाइम म्हणजे सीपीयूने हार्डडिस्ककडे एखादी फाइल मागितली की ती सीपीयूकडे पोहोचण्याचा वेळ. हा वेळ 10 ते 20 मिलीसेकंद इतका असतो.
हार्डडिस्कचं काम कसं चालतं हे कळण्याचा सोपा मार्ग म्हणजे हार्डडिस्क उघडून बघायची. मात्र हे असे केल्याने हार्डडिस्क खराब होऊ शकते. त्यामुळे एक्स्पर्ट असाल तरच करा, अन्यथा एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊन हार्डडिस्क उघडा. हार्डडिस्क म्हणजे एक सीलपॅक अॅल्युमिनियमचा बॉक्स असतो. ज्याच्या एका बाजूला कंट्रोलर इलेक्ट्रॉनिक्स असतात. हे इलेक्टॉनिक्स रीड आणि राइटचं तंत्र सांभाळत असतात. आणि याशिवाय एक मोटर असते जी हे प्लॅटर फिरवत असते. प्लॅटर म्हणजे टेपसारखाच प्रकार असतो.
हार्डडिस्क जेव्हा वापरात असते तेव्हा हे प्लॅटर साधारण 3600 ते 7200 आरपीएम या वेगाने फिरत असते. यासोबत असतो तो म्हणजे आर्म. रीड आणि राइट हेड्सना कंट्रोल करण्याचे काम हा आर्म करतो. बहुतांश हार्डडिस्कमध्ये एकापेक्षा अधिक प्लॅटर्स असतात. आणि त्याला अनुसरून रीड आणि राइट हेड्स. डेटा जेव्हा हार्डडिस्कमध्ये स्टोअर केला जातो तेव्हा तो प्लॅटरच्या पृष्ठभागावर सेक्टर आणि ट्रॅक्समध्ये सेव्ह होतो. ट्रॅक्समध्ये एकात एक अशी वर्तुळं असतात. आणि त्यांना छेदणारी सेक्टर्स बनवलेली असतात.
प्रत्येक सेक्टरमध्ये ठरावीक बाइट्सचा डेटा स्टोअर होत असतो. काहींमध्ये 256 तर काहींमध्ये 512 बाइट्स. अशा काही सेक्टर्सचं मिळून एक क्लस्टर तयार होतं. लो लेव्हल फॉरमॅटिंग करून हार्डडिस्कच्या प्लॅटरवर ट्रॅक्स आणि सेक्टर्स तयार होतात. त्यानंतर होणार्या हाय लेव्हल फॉरमॅटिंगमध्ये या तयार झालेल्या जागांमध्ये डेटा सेव्ह होत जातो.
-सुनील आढाव
कला संपादक, ‘जनशक्ति’
7767012211