मूकनाट्य आणि विविध गीतांची धमाल

0

जळगाव । उमविच्या ’युवारंग’च्या तिसर्‍या दिवशी मूकनाट्यासह शास्त्रीय गायन, सुगम, समुह गीत गायन, मिमिक्रीने रोमांच शिगेला पोहोचविला. अवयवदान, सेल्फी वेड, बालमजूरी, वाहतुकसमस्या, स्वच्छता, राजकारण, प्रेम, शौक्षणिक धोरण, कुटुंबव्यवस्था, आंतरजातीय विवाह अशा प्रश्नांवर मार्मिक शब्दात केलेले मूकनाट्याद्वारे केलेले विडंबन, शास्त्रीय गायनाने कानसेनांचा कानतृप्त करणारा कलाविष्कार, आणि ताकदीने सादर केलेले शास्त्रीय गायन, सुगम, समुह गीत गायन, मिमिक्री यामुळे युवारंग युवक महोत्सवाचा तिसरा दिवस विस्मरणीय ठरला. तिसर्‍या दिवशी मुकनाटय, समुह गीत, सुगम गायन, मिमिक्री, वादविवाद, फोटोग्राफी, शास्त्रीय गायन, व्यंगचित्र, कोलाज आणि क्ले मॉडेलिंग हे कलाप्रकार सादर झाले.

नाट्यकलावंत रवी पटवर्धन यांची भेट
शनिवारी दुपारी नाटयकलावंत रवी पटवर्धन यांनी युवक महोत्सवाच्या ठिकाणी भेट देवून विद्यार्थ्यांंना आपल्या खर्जातील आवाजात साद घालत रामराम केला आणि आपण बुलंदपणे यशस्वीतेकडे आगेकुच करा अशा शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाच्या वतीने माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी पटवर्धन यांचा सत्कार केला. तसेच विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी मंचावर रवी पटवर्धन यांना गराडा घालत सेल्फीचा आनंद लुटला. त्यांनी देखील प्रतिसाद देत कलाकार कितीही वयस्क असला तरी त्यातील अभिनेता सतत तरूण असतो आणि उर्जेने भारलेला असतो याची प्रचिती तरूण तरूणींनी घेतली. रवी पटवर्धन यांच्या आगमनाची बातमी कळताच काही अंशी खाली झालेला मुख्य हॉल अवघ्या काही मिनीटातच पूर्ण भरून गेला होता.

सामाजिक सामन्यांवर मूक भावनांना दाद
युवारंगच्या तिसर्‍या दिवशी विविध सामाजिक समस्यांवर मूक अभिनयाने प्रहार केला गेला. कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी रंगमंच 1 वर मुकनाटय प्रकारात विविध सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, यासह सहभागी स्पर्धकांनी स्त्री-भ्रुण हत्या, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, शिक्षण व्यवस्था, हुंडाबळी, स्वच्छ भारत अभियान, सेल्फी फिवर, आदी विषयावर 53 संघांनी मुकनाटयाद्वारे सहभाग नोंदवत सादरीकरण केले. 53 संघांपैकी जवळपास 40 संघांनी मोबाईल आणि सेल्फी याच विषयावर भर दिला.

सौ.शामलाताई गुणवंतराव सरोदे रंगमंच 3 वर वादविवाद या स्पर्धेत सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत नोटबंदीचा परिणाम या विषयावर प्रतिकुल आणि अनुकुल दोन्ही बाजूंवर आपले मते व्यक्त केली या स्पर्धेत 66 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. फोटोग्राफीच्या अंतीम फेरीत गेलेले 10 फोटोंचे समिक्षक परीक्षकांद्वारे केले गेले..कै.सिंधूताई चौधरी रंगमंच क्रमांक 4 सुगम गायन – या कलाप्रकारात 35 स्पर्धकांनी भावगीत, अभंग, भक्तीगीत आणि शास्त्रीय गायन कला प्रकारात मालकंस, रागनंदनी, भिमपलास, जोग, कुरीया धनश्री, कलावती, मदमाद सारंग, सारंग वृदांवन, राग बागेश्री, मारो पिहाग, तोडी गुजरी, भौरव आणि यमन आदी रागावर 11 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. सुमनताई पाटील रंगमंच क्रमांक 5 वर कोलाज स्पर्धा झाली. यात निसर्गचित्र या विषयावर विविध विषय हाताळत कोलाज साकारले यात 40 संघांनी सहभाग नोंदविला. यासह व्यंगचित्र स्पर्धेत नोटाबंदी या विषयावर 30 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कै.रमाताई देशपांडे रंगमंच क्रमांक 6 वर क्ले मॉडेलिंग या कलाप्रकारात 30 स्पर्धेकांना आवडता प्राणी हा विषय देण्यात आला होता.

विविध गीतप्रकारांची धूम
दुपार सत्रात समूह गीत या गायन प्रकारात देशभक्तीपर, लावणी, पोवाडे, गवळण आदी गीतांचे सादरीकरण करत उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. तसेच सारे जहाँ से अच्छा, हर करम अपना करेंगे ए वतन तेरे लिए, मौ भारत का रहने वाला हूँ भारत के गीत सुनाता हूँ आदी देशभक्तीपर गीत सादर करून संपूर्ण मंच राष्ट्रभक्तीने ओतप्रोत झाला. कै.शकुंतलाबाई जीवराम महाजन रंगमंच क्रमांक 2 वर सुगम गायन (पाश्चिमात्य) कलाप्रकारात स्पॅनीश, जर्मन, ओपेरा हे पाश्चिमात्य गीतांचे प्रकार सादर केले. यात गिटार, व्हायोलीन, पियानो आदी संगीत साधनांचा आविष्कार सादर करून प्रेक्षकांमधून दाद मिळवली. यात एकुण 13 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. आणि समुह गीत (पाश्चिमात्य) या कलाप्रकारात पाश्चिमात्य समुह गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून आपल्या तालावर ताल धरायला भाग पाडले आणि टाळयांचा कडकडाट रंगमंचावर गुंजला.