रावेर । गट व गणांच्या निवडणुकांसाठी भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभेपुर्वी तालुका ताब्यात घेण्यासाठी नामी संधी असून प्रत्येक तालुकाध्यक्षांनी तालुक्याच्या राजकारणात आपल्या पक्षाचा दबदबा निर्माण करण्यासाठी व्यूह रचायला सुरुवात केली आहे. यावर्षी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असल्याने प्रत्येक गट व गणांत निवडणुकीवर जातीय प्रभाव असतो. त्यामुळे ज्या-त्या ठिकाणच्या बहुसंख्य जातीवर तसेच पुढारी व प्रतिष्ठित नागरिकांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्नशिल आहे.
तालुकाध्यक्षांकडून अपूर्ण पत्ते उघड
आजपर्यंत कोणत्याही तालुकाध्यक्षांनी आपल्या पक्षाचे संपूर्ण पत्ते उघडलेले नाही. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी प्रत्येक तालुकाध्यक्ष छाती ठोकूनसांगतात, आमचीच सत्ता येणार परंतु चारही पक्ष ग्रामीण मतदारांना आपल्याला मतदान करण्यासाठी कसे प्रोत्साहन करतात यावर बरेच राजकारण अवलंबून राहील. दरम्यान, गटात व गणात निवडणूक लढण्यासाठी आघाडीच्या पक्षातील तुल्यबळ उमेदवार राहणारच परंतु इतर रिपाइं, भारिप बहुजन महासंघ, मनसे, बसपा व अपक्षांची सुध्दा भाऊगर्दी होणार आहे.
भाजपा, शिवसेनेचे स्वतंत्र उमेदवार
भाजपातर्फे सर्व गट व गणांमध्ये उमेदवारांची चाचपणी झाली आहे. फक्त घोषणा होण्याची बाकी असून सर्वचे सर्व जागा निवडून येतील, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील सांगतात तर इकडे शिवसेनेने देखील तुल्यबळ उमेदवार देवून भाजपाला रोखण्यासाठी व तालुका ताब्यात घेण्यासाठी व्यूहरचना आखल्याचे शिवसेनेच तालुकाध्यक्ष योगराज पाटील यांनी सांगितले.
काँग्रेस, राष्ट्रवादीचे आघाडीचे संकेत
तालुक्यातील समांतर गट व गण मिळावे असे दोन्ही पक्षांकडून सांगितले जात आहे. विधानसभेत मिळालेल्या पराभवानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी करणार असल्याचे वृत्त आहे. काँग्रेसने जुने व ज्येष्ठ अर्जून जाधव यांना तालुक्याची जबाबदारी दिल्याने पक्षात देखील नवचैतन्य आले असून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पाटीलदेखील उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागले आहे.