खिर्डी । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर 15 रोजी खिर्डी खुर्द येथे आयोजित करण्यात आले होते. गेल्या सात दिवसीय शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी गावात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान, कचरापेटी स्थापना, जनजागृतीपर रॅली, व्याख्यान व पथनाट्य सादरीकरण केले. या कार्यक्रमामार्फत जनजागृतीपर स्त्रीभृण हत्या, पर्यावरण, रस्ते व पाणी सुरक्षा या विषयांवर स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर केले. या शिबिराचा समारोप 21 रोजी शांताबाई प्रल्हाद राणे माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला.
विद्यालयाचे संचालक भरत लढे, एकनाथ नेहेते व माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एस.एस. सुरदास उपस्थित होते. तसेच डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील प्रा.डॉ. व्ही.आर. भंगाळे, डॉ. शैलेश तायडे, प्रा. आर.डी. चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने करण्यात आली. तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल साळुंके यांनी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून अजय प्रजापती व हर्षाली पवार यांची निवड केली. मान्यवरांच्या हस्ते या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देण्यात आले. सुत्रसंचालन हर्षाली पवार हिने केले तर आभार विशाल गायकवाड याने मानले. यशस्वीतेसाठी विशाखा बिचवे, भूषण इंगळे यांनी सहकार्य केले.