यावल । गरीब कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे निराधार झालेल्या कुटुंबाला शासनाकडून तोकडी का होईना मदत मिळते. गरजेच्यावेळी असा दिलासा लाखमोलाचा ठरतो. या योजनेनुसार पात्र गरजूंना मदत मिळवून देण्यात प्रशासनाची भूमिका महत्वाची असते, असे आमदार हरिभाऊ जावळे यांनी सांगितले. तालुक्यातील 11 गावांतील बीपीएल यादीतील 25 कुटुंबप्रमुखांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मुत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना संजय गांधी निराधार योजनेतून प्रत्येकी 20 हजारांचे अर्थसहाय देताना ते बोलत होते. याप्रसंगी आमदार जावळे म्हणाले की, सरकार लोककल्याणकारी योजना राबवित असून या योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळण्याची गरज आहे. तहसीलदार कुंदन हिरे, योजना समितीचे अध्यक्ष विलास चौधरी, हर्षल पाटील, अजय भालेराव, डॉ. नरेंद्र कोल्हे, उज्जैनसिंग राजपूत, नायब तहसीलदार सुनील समदाने, योजनाचे लिपिक आर.बी.मिस्तरी आदी उपस्थित होते.