45 हजारांची लाच भोवली : धुळे जात पडताळणी विभागातील लाचखोर लिपिक एसीबीच्या जाळ्यात

भुसावळ/धुळे : धुळे जात पडताळणी विभागातील लाचखोर कनिष्ठ लिपिकाला 45 हजारांची लाच घेताना मंगळवारी दुपारी धुळे एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. विजय रतन वाघ (51) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. धुळे शहरातील सिद्धीविनायक गणपती मंदिरासमोर हा सापळा एसीबीने यशस्वी केला.

जात प्रमाणपत्रासाठी मागितली लाच
शहरातील रहिवासी असलेल्या 38 वर्षीय तक्रारदार यांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह मूळ जात प्रमाणपत्र धुळे जात पडताळणी समितीकडे जमा केले होते मात्र अर्जासोबत जमा केलेले जात प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी संबंधित विभागात अर्ज दिला होता परंतु हे जात प्रमाणपत्र हरवल्याचे सांगण्यात आल्याने तक्रारदाराने जात प्रमाणपत्रांची दुय्यम प्रत द्यावी अशी मागणी केली. त्याच्या मोबदल्यात कनिष्ठ लिपिक विजय रतन वाघ (51, रा.सुशीलनगर, धुळे ) यांनी 14 फेब्रुवारी रोजी 50 हजार रुपये लाचेची मागणी केली मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची इच्छा नसल्याने त्यांनी 45 हजारांमध्ये तडजोड करीत धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली होती.

मंदिराजवळ सापळा रचून कारवाई
धुळे एसीबीने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर मंगळवारी दुपारी सापळा रचला. धुळे शहरातील सिद्धिविनायक गणपती मंदिराजवळील रस्त्यावर संशयीत आरोपीने तक्रारदाराला बोलावल्यानंतर पथक कारवाईसाठी सज्ज झाले. तक्रारदाराकडून आरोपी विजय वाघ यांनी लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीच्या घराची झडती घेण्यात आली मात्र त्यात काही आढळले नाही. रात्री उशिरा धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
नाशिक एसीबीचे अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे व पोलिस निरीक्षक मंजित चव्हाण, कर्मचारी राजन कदम, कैलास जोहरे, शरद काटके, कृष्णकांत वाडिले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर, भूषण शेटे, महेश मोरे, संदीप कदम, गायत्री पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथथकाने हा सापळा यशस्वी केला.