45 वर्षांवरील नागरिकांची तपासणी करा: जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

0

शिरपूर:तालुक्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी 45 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांची तपासणी करून संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरपूर येथे दिलेल्या भेटीत नगर पालिकेच्या सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी आ. काशीराम पावरा, जि.प.चे अध्यक्ष तुषार रंधे, शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेश पटेल, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, माजी मंत्री अमरिशभाई पटेल आदी उपस्थित होते.

घशातील स्रावांचे नमुने घेण्यासाठी संकलन केंद्र सुरू करा
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतरही शिरपूर तालुक्यात रुग्ण संख्या वाढत आहे. ही काळजीची बाब आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने आता तपासणीसाठी व्यापक मोहीम राबवावी. 45 वर्षांवरील ज्या नागरिकांना रक्तदाब आणि रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आहे,
अशा नागरिकांची तपासणी करण्यात यावी. यात कोणाला उपचाराची आवश्यकता भासली तर तत्काळ रुग्णालयात दाखल करुन औषधोपचार सुरू करावेत. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर विवाह आणि अंत्यसंस्कारासाठी गर्दी वाढत आहे. त्यातून कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा समारंभावर लक्ष्य ठेवण्यासाठी पोलीस पाटील, तलाठी आणि ग्रामसेवक यांची संयुक्त समिती गठित करण्यात यावी. नियमांपेक्षा अधिक गर्दी असेल तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. त्यासाठी ग्रामसेवकांनी फिर्याद द्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले. याप्रसंगी शिरपूर येथील वाढती रुग्ण संख्या पाहता अंबिका नगरात घशातील स्रावांचे नमुने घेण्यासाठी संकलन केंद्र सुरू करावे, असेही त्यांनी सांगितले.

तालुक्यातील बोराडी येथील आयुर्वेद महाविद्यालयात कोविड केअर हेल्थ सेंटर सुरू करण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करावा, असेही जिल्हाधिकारी यादव यांनी सांगितले. बैठकीत उपविभागीय अधिकारी डॉ. बांदल यांनी कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.