हगणदारी मुक्तीची जिल्ह्याची चिंताजनक स्थिती; अजूनही जिल्हा 50 टक्के हगणदारी मुक्त नाही

0

जळगाव। जिल्ह्यात जिल्हा परिषदेची निवडणूक जाहिर होताच राजकीय पक्षांमध्ये वारे जोरात वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षाकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु आहे. लवकरच राजकीय पक्षाकडून मागील पंचवार्षिक निवडणुकी दरम्यान दिलेले आश्‍वासन पुर्ण न करता नविन आश्‍वासन देण्यासाठी प्रचार सुरु होईल. दरम्यान निवडणुकीचा प्रचारात राजकीय पक्षाकडून कोणती आश्‍वासने दाखविण्यात येणार आहे. कारण मागील वर्षी दिलेल्या आश्‍वासनाची पुर्ती करण्यात जवळजवळ राजकीय पुढारी अपयशी ठरले आहे. त्यांनी दिलेल्या आश्‍वासनापैकीच एक असलेले गाव हगणदारी मुक्त करण्याचे. संपुर्ण जिल्ह्याची स्थिती बघता जिल्हा डिसेंबर 2016 पर्यत 50 टक्केही हगणदारी मुक्त झालेला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. तसेच अनेक दिग्गज नेते, प्रतिष्ठित व्यक्तिंचे गावे, तालुका हगणदारी मुक्त झालेले नाही.

स्वच्छ भारत मिशनचा फज्जा
नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मिशनची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. तसेच केंद्र आणि राज्य शासन स्वच्छ भारत मिशनचे तुरे मिरवित फिरत असली तरी स्वच्छ भारत मिशनची परिस्थिती वास्तविक वेगळी आहे. हगणदारी मुक्त करण्यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असून नवनविन शक्कल लढवित आहे. आताच शासनाने 1 जानेवारी पासून उघड्यावर शौचविधी करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्याचा बडगा उचलला आहे. मात्र राजकीय मंडळीसहीत जिल्हा प्रशासन हगणदारी मुक्त करण्यात अपयश ठरत असेल तर यात त्यांचा दोष काय? ही मंडळी डिसेंबर 2016 पर्यत जिल्हा हगणदारी मुक्त करु शकली नाही.

गिरीष महाजनांचा तालुका पिछाडीवर
स्वच्छ भारती मिशन अंतर्गत गावे हगणदारी मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. मात्र कोणताही तालुका शंभर टक्के हगणदारी मुक्त झाला नसल्याचे चित्र आहे. यात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचा मतदारसंघ असलेला जामनेर तालुका पिछाडीवर आहे. जामनेर तालुका डिसेंबर 2016 अखेर फक्त 35 टक्के हगणदारी मुक्त झाला आहे. संपुर्ण जिल्हात जामनेर तालुका पिछाडीवर आहे.

हगणदारी मुक्त तालुकानिहाय आकडेवारी
जिल्ह्यात हगणदारी मुक्तीची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. दोन तीन तालुका वगळता कोणताही तालुका पन्नास टक्केपेक्षा जास्त हगणदारी मुक्त होवू शकलेला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात तालुकानिहाय टक्केवारी याप्रमाणे धरणगाव 50.9, चोपडा 48, रावेर 60.6, यावल49.3, मुक्ताईनगर 58.9, अमळनेर 43.9, पारोळा 41.3, एरंडोल 48.7, भडगाव 47.7, पाचोरा 38.1, जामनेर 35, चाळीसगाव 49, बोदवड 52.5, भुसावळ 84 अशी आकडेवारी तालुकानिहाय शासनातर्फे प्रसिध्द करण्यात आली आहे. ही आकडेवारी डिसेंबर 2016 पर्यतच आहे.

दिग्गजांचे गावे हगणदारी मुक्त नाही
हगणदारी मुक्तीचा संदेश देण्यासाठी राजकीय मंडळी हातात झाडू घेवून उतरली खरी परंतु त्याचा काहीही फायदा होतांना दिसत नसल्याचे चित्र हगणदारी मुक्तीचे तालुकानिहाय आकडेवारीवरुन स्पष्ट होते. राजकीय नेतेमंडळी सहीत अनेक दिग्गजांची गावे, तालुका संपुर्णपणे हगणदारी मुक्त होवू शकलेले नाही. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा मतदारसंघ असलेला मुक्ताईनगर तालुका देखील संपुर्णपणे हगणदारी मुक्त होवू शकला नाही. प्रसिध्द साहित्यिक भालचंद्र नेमाडे, उमवीचे कुलगुरु डॉ.पी.पी.पाटील हे यावल तालुक्यातील असून यावल तालुका देखील हगणदारी मुक्त नाही. ही मंडळी फक्त स्वच्छ भारत अभियानाचे संदेश देतांनाच दिसत आहे.