धुळे : राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी. राष्ट्रध्वजाचा नागरिकांनी मान राखावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या एस. यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. चैतन्या यांनी म्हटले आहे, दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन देशभर साजरा करण्यात येतो. समारंभाचे विविध शासकीय, निमशासकीय तसेच खासगी संस्थांमार्फत ध्वजारोहण करण्यात येतात. स्थानिक पातळीवर जनतेमार्फत राष्ट्रीय ध्वजाविषयी असलेले प्रेम, निष्ठा, अभिमान दर्शविण्याकरीता वैयक्तिकरीत्या छोट्या राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो.
राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा. यासंदर्भात शासनामार्फत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तसेच जाणीवपूर्वक जर राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा- 1971 चे कलम 2 अनुसार कारवाई करण्यात येते. काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी तसेच विविध कला, क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरीत्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतरत्र टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. जेणेकरुन नंतर हे छोटे- छोटे राष्ट्रध्वज रस्त्याचे कडेला किंवा इतरत्र ठिकाणी पडलेले, विखुरलेले आढळतात. हे दृश्य राष्ट्रीय प्रतिष्ठेला शोभणारे नसल्याने राष्ट्रध्वजाचे वापरानंतर एकतर त्याचा योग्य तो मान राहील याप्रमाणे ते ठेवण्यात यावे. अथवा शासकीय संस्था, तसेच इतर संघटनांना सुपूर्द करावे. सदर अशासकीय संस्था व संघटनांनी त्यांना शासनाने दिलेल्या अधिकारानुसार सदरचे राष्ट्रध्वज मा. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्याकडे सुपूर्द करावेत.
अशाप्रसंगी असे रस्त्यात पडलेले इतरत्र विखुरलेले राष्ट्रध्वज राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याने केंद्र शासनाच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजाकरीता प्लॉस्टिकच्या वापरास मान्यता नाही. प्लास्टिकचे ध्वजाचा वापर पूर्णपणे बंद करावा. जनतेच्या वैयक्तिक वापरासाठी छोट्या कागदी ध्वजाचा वापर करण्यात यावा. तथापि, अशा कागदी ध्वजाचा वापर करताना त्याचा योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. तसेच असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून न देता ते अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना सुपूर्द करावे. सदर अशासकीय संस्था व संघटनांनी त्यांना शासनाने दिलेल्या अधिकारानुसार सदरचे राष्ट्रध्वज जिल्हाधिकारी व तहसीलदार यांचेकडे सुपूर्द करावे, असेही जिल्हा पोलिस अधीक्षक चैतन्या यांनी नमूद केले आहे.