Ganja plants worth 46 lakh seized: Police action in Pachora taluka पाचोरा : पाचोरा तालुक्यातील सावखेडा शेतशिवारातील गांजाची शेतीवर पोलिसांनी कारवाईचा बुलडोजर फिरवत 46 लाख रुपयांची गांजाची 200 झाडे जप्त केली तर एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी बुधवारी रात्री ही कारवाई केली. सुभाष बाबूराव पाटील (59) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सावखेड, ता.पाचोरा शिवारातील शेतात त्याने गांजाची लागवड केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी बुधवारी रात्री तिथे लागलीच छापा टाकला. त्यावेळी शेतात गांजाची 200 झाडे आढळून आली असून त्याची 46 लाख रुपये इतकी किंमत आहे. याबाबत सुभाष पाटील याच्याविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक महेंद्र वाघमारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. दरम्यान, एरंडोल तालुक्यातीलही याच महिन्याच्या सुरुवातील खडकीसिम शेतशिवारातील गांजाची शेती स्थानिक पोलिसांनी उधळून लावली होती. यावेळी पोलिसांनी तब्बल 61 लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करत दोन जणांवर गुन्हा दाखल केला होता.