रेल्वेच्या इतिहासात भुसावळात 160 वर्षानंतर जंक्शन बंद

0

भुसावळ विभागात शंभर टक्के लॉकडाऊन : बसस्थानकावर शुकशुकाट : व्यापार, व्यवसाय पूर्णपणे ठप्प

भुसावळ : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी 23 ते 31 मार्च दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता लॉक डाऊनचे आदेश दिल्यानंतर भुसावळ विभागात सोमवारी सर्वत्र दुकाने तसेच व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले. दिवसभर रस्ते निर्मनुष्य होते तर भुसावळ जंक्शनच्या 160 वर्षांच्या इतिहासात प्रथमच स्थानकावर शुकशुकाट दिसला तसेच बसस्थानकातून एकही बस सुटली नाही. भुसावळातील बंद पाहण्यासाठी विनाकारण रस्त्यांवर गर्दी करणार्‍या टारगट तरुणांना पोलिसांनी काठीचा प्रसाद देत वठणीवर आणून माघारी फिरवले. भुसावळ विभागातील, यावल, मुक्ताईनगर, बोदवडमध्येही लॉकडाऊन यशस्वी झाले तर रावेरात दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर 48 तास संचारबंदी असल्याने शहरात स्मशानशांतता पसरली आहे.

रेल्वे स्थानक बंद : कडेकोट बंदोबस्त
160 वर्षांच्या इतिहासात प्रथमच रेल्वे स्थानकावर रविवारनंतर सोमवारी शुकशुकाट जाणवला. भारतीय रेल्वेने सर्वच रेल्वे गाड्या रद्द केल्याने सोमवारी येथील रेल्वे स्थानकावरून एकच रेल्वे गाडी धावली तर त्यातून कुणीही प्रवास गेला नसल्याचे समजते. रेल्वे प्रशासनाकडून तिकीट खिडक्या बंद करण्यात आल्या असून नागरीकांना रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी प्रवेश नाकारला जात आहे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी तिकीट नसल्याने कोणालाही प्लॅटफॉर्मवर जाऊ दिले जात नाही शिवाय सुरक्षा यंत्रणेचा त्यासाठी मोठा बंदोबस्त आहे. सोमवारी फक्त कामाख्य एलटीटी ही एकमेव गाडी धावली.

भुसावळ न्यायालयात तातडीचे कामकाज चालणार
उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे अति आवश्यक असल्यास पक्षकार व त्यांचे वकील यांनी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत शिवाय भुसावळ न्यायालयात फक्त तातडीच्या स्वरुपाचेच कामकाज होणार आहे. दैनंदिन बोर्डावर असलेल्या प्रकरणांच्या पुढील तारखा न्यायालयाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असल्याने त्यासाठी न्यायालयात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे कळवण्यात आले आहे. दरम्यान, तातडीच्या प्रकरणांमध्ये दिवाणी स्वरूपाच्या केसेसमध्ये मनाईहुकूम तसेच फौजदारी प्रकरणांमध्ये अटकपूर्व जामीन, कलम 164 जवाब व रीमांड आदींचा समावेश असणार आहे.

जमाव जमवणार्‍यांविरुद्ध दाखल व्हावेत गुन्हे
पाच पेक्षा अधिक लोक जमल्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश असलेतरी शहरातील विविध चौकात काही लोक विनाकारण उभे राहून नियमांचा भंग करीत असल्याने अशांवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

भुसावळात भाजीपाल्याची चढ्या दराने विक्री
बंदच्या पार्श्‍वभूमीवर भुसावळातील आठवडे बाजारात चढ्या दराने भाजीपाला विकला जात आहे तर बाहेरगावावरून भाजीपाला येणे बंद झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनी दुप्पट किंमत लावून वस्तूंची विक्री सुरू केल्याने प्रशासनाने दखल घेण्याची अपेक्षा आहे. सोमवारी 20 रुपये किलो विक्री होणारे बटाटे व कांदे 30 रुपयांप्रमाणे विक्री झाले तर 30 रुपये किलोने विक्री होणार्‍या मिरचीची 80 रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली. काही दिवसांपूर्वी दहा रुपये किलोंप्रमाणे असणारे टमाटे चक्क 30 रुपये किलोंप्रमाणे विक्रेते विकताना दिसून आले त्यामुळे ग्राहकांनाही नाईलाजास्त गरजेपोटी जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागला.

व्यापारी, व्यावसायीकांचा कडकडीत बंद
लॉकडाऊनच्या आदेशाची भुसावळातील व्यापारी, व्यावसायीक, हॉटेल व्यावसायीक तसेच हातावर व्यवसाय करणार्‍या व्यावसायीकांनी गांभीर्याने घेत सोमवारी शंभर टक्के प्रतिष्ठाने बंद ठेवल्याने दिवसभर शहरात सर्वत्र शुकशुकाट दिसून आला. दुपारच्या वेळी तर रस्ते निर्मनुष्य झाले होते. रेल्वे तसेच एस.टी.बसेससोबतच खाजगी प्रवासी वाहतूक करणारी वाहनेदेखील बंद ठेवण्यात आली होती शिवाय रुग्णांसाठी केवळ रीक्षा सुरू असल्याचेही दिसून आले. भुसावळ शहरातील वर्दळीच्या जामनेर रोड, यावल रोड, वरणगाव रोड, बसस्थानक परीसरात, डेलि मार्केट आदी भागातील दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. अत्यावश्यक बाब म्हणून दुध डेअरी, किराणा दुकाने, मेडिकल शॉप तसेच दवाखाने सुरू असल्याचे चित्र होते.

पालिकेच्या घंटागाड्यांद्वारे जनजागृती -मुख्याधिकारी
महाराष्ट्रात संचारबंदी लागू असल्याने या पार्श्‍वभूमीवर जनजागृतीसाठी पालिकेच्या पाच घंटागाड्यांवर माईक लावून पोलिस बंदोबस्तात जनजागृती करण्यात येईल, असे मुख्याधिकारी करुणा डहाळे म्हणाल्या. चढ्या दराने भाजीपाला विक्री होत असल्यास निश्‍चित कारवाई करू तसेच मंगळवारी पालिकेच्या पथकातर्फे सूचना केल्या जातील, असेही त्यांनी सांगत नागरीकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.