धुळे । येथील जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ यांना शिपाई संजय बोरचे याच्यासह 50 हजार रुपयांची लाच घेतांना अटक झाली. आपल्याच विभागातील कर्मचार्याला अँटी करपशनच्या कारवाईचा धाक दाखवून त्याच्याकडे रौंदळ 50 हजाराची लाच मागत असल्याचे समोर आले आहे. नंदुरबार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे डिवायएसपी एस.एस.आहेर यांच्यासह पथकाने आज दुपारी ही कारवाई केल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
शिपायाला मागितली लाच
धुळे जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात शेखर रौंदळ हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे कामासाठी गेलेल्या तक्रारदाराकडे रौंदळ यांनी शिपाई संजय बोरसे याच्यामार्फत 50 हजारांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने नंदुरबार लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने आज दुपारी धुळे जिल्हा परिषदेत सापळा रचण्यात आला. यावेळी तक्रारदाराकडूनशिपायामार्फत 50 हजारांची लाच घेतांना उपमुख्यकार्यकारी अधिकारी रौंदळ यांच्यासह शिपाई संजय बोरसेला अटक झाली. या प्रकरणी उशिरा पर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
धुळे जिल्हा परिषदेतील लाचखोरीबाबत अनेकदा चर्चा होत असते. येथील प्रत्येक कागद हा वजनाशिवाय हालत नाही असे नागरिकांत बोलले जाते. या आधी देखील जिल्हा परिषदेत विविध विभागांमध्ये लाचखोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मात्र, परिणामकारक कारवाई न झाल्याने अशा घटनांना आळा घालणे कठिण होत होते. आजवर छोट्या-मोठ्या कारवाईत कनिष्ठस्तरावरील कर्मचारीच लाचखोरीत सापडत होते. मात्र, आज एका बड्या वरिष्ठ अधिकार्याला लाच घेतांना पकडण्यात आल्याने मोठा मासा गळाला लागल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे नंदुरबार लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी ही कारवाई केली असून याबाबत खूप गुप्तता पाळण्यात आली होती. या घटनेने जिल्हा परिषदच सुन्न झाल्याचे दिसून येत होते.