47 वेळा नापास होऊनही हार नाही मानली

0

जयपुर । परीक्षांचे निकाल लागल्यावर मुलांचे वेगवेगळे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. कोणी जास्त मार्क्स मिळूनही रडत असतो, तर कोणी काठावर पास होऊनही खूप आनंदी असतो. परीक्षेत नापास झाल्यावर अनेकांना आपले आयुष्यच संपल्यासारखे वाटते. त्यांनी हे उदाहरण पाहण्यासारखे आहे. कारण हा माणूस तब्बल 47 वेळा परीक्षेत नापास झाला आहे. हे गृहस्थ म्हणजे राजस्थानमध्ये राहणारे शिवचरण यादव. नापास झाल्यावर सोळाव वरिसं धोक्याचे असं म्हणणार्‍या मुलांना शिवचरण यांच वय कळाल्यावर धक्काच बसेल. कारण शिवचरण यांनी सध्या वयाची 78 वी पूर्ण केली आहे. राजस्थानमध्ये राहणारे शिवचरण यांनी अजूनही परीक्षा देणं काही सोडलेलं नाही. दहावी पास झाल्याशिवाय लग्न न करण्याचा निर्धार असल्याने ते अद्याप अविवाहित आहेत. सध्या ते एका मंदिरात राहत असून, त्यांचा सर्व खर्च सरकारच्या पेन्शनवर भागत आहे. 1969 साली शिवचरण यांनी पहिल्यांदा दहावीची परीक्षा दिली होती. 1995 मध्ये दिलेल्या परीक्षेत शिवचरण गणित विषय सोडून सर्व विषयात पास झाले होते. पण या वर्षीच्या परिक्षेत ते बर्‍याच विषयात शून्य मार्कांनी नापास झाले आहेत. अर्थात याला कारणीभूत त्यांचं वाढतं वयोमान आणि अधू दृष्टी आहे. जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत परीक्षा देत राहण्याचा त्यांचा निर्धार आहे. लग्नाचं वय तर गेलं, पण परीक्षा देत राहून नवीन रेकॉर्ड करणार असल्याचं शिवचरण यांनी एका मुलाखतीत सांगितलं. शिवचरण यांच्यापासून अनेक विद्यार्थ्यांनी धडा घ्यायला हवा. एक परीक्षा कोणाचं आयुष्य ठरवत नाही, तर अपयशातून जो सावरतो तो आयुष्यात घडत जातो.