सशक्त लोकशाहीसाठी मतदान करा

0

धुळे : भारतासारख्या खंडप्राय देशात लोकशाही रुजविणारा भारत हा एकमेव देश आहे. प्रत्येक निवडणुकीतून आपण शिकत आहोत. त्यामुळे भारतीय लोकशाही प्रगल्भ होत आहे. लोकशाही आणखी सशक्त होण्यासाठी प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले. जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय, धुळे यांच्यातर्फे येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त मुख्य कार्यक्रम झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी पांढरपट्टे बोलत होते. यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. वाय. जी. फुलपगारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जे. आर. वळवी, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नायब तहसीलदार प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

नवमतदारांना ओळखपत्र वाटप
यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण, स्वीप कार्यक्रमांतर्गत तृतीयपंथी मतदारांना निवडणूक ओळखपत्र वितरण, नवमतदारांना ओळखपत्र वाटप, उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांना प्रशस्तीपत्र वितरण, महिला मतदार नोंदणीसाठी सहकार्य केल्याबद्दल तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटर यांचा सत्कार करण्यात आला. मोहाडी येथील स्वयंसेवी संस्थेच्या पथकाने पथनाट्य, तर सुभाष कुलकर्णी यांनी मतदारांना आवाहन करणारे गीत सादर केले . भारत निवडणूक आयोगाकडून या वर्षाच्या राष्ट्रीय मतदार दिवसाचे घोषवाक्य `सक्षम करू या युवा व भावी मतदार` असे आहे. त्यामुळे भारताचे आधारस्तंभ असलेले युवक/युवती यांनी सक्षम होवून मतदार नोंदणी जरूर करीत राष्ट्राच्या जडण-घडणीत आपला सहभाग नोंदवावा, असेही पांढरपट्टे यांनी सांगितले.

मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करा
प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावत लोकशाही व्यवस्थेला सशक्त करावे. या दिवशी मतदारांनी अन्यत्र कुठेही जावू नये. तृतीयपंथी मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त करणे ही चांगली बाब आहे. त्यांना यानिमित्ताने प्रवाहात आणावे. त्यांच्याविषयी असलेले गैरसमज, अंधश्रध्दा बाजूला केल्या पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी पांढरपट्टे म्हणाले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी वळवी यांनी सांगितले, भारतीय घटनेनुसार मतदार म्हणून अधिकार प्राप्त होण्याकरीता भारतीय नागरिकाने वयाची 18 वर्षे पूर्ण करणे आवश्यक असते. 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विहित नमुन्यातील अर्जातील माहिती भरुन त्यासोबत वयाचा दाखला व रहिवास पुरावा सादर केल्यावर अशा व्यक्तीची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येते.

तरुण सहकार्य आवश्यक
मतदार नोंदणी व मतदानाला प्रत्येक पात्र नागरिकाने प्रतिसाद दिला पाहिजे. लोकशाही समृध्द होण्यासाठी नवमतदारांनी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच ज्यांना मतदान केंद्रापर्यंत पोचण्यासाठी अडचण असेल असे दिव्यांग मतदार, वृध्द मतदारांना तरुण मतदारांनी सहकार्य केले पाहिजे, असे डॉ. फुलपगारे यांनी सांगितले. राही फाऊंडेशनचे प्रवीण शेटे यांनी मनोगत व्यक्त केले. वाहिद अली सय्यद यांनी सूत्रसंचालन केले. नायब तहसीलदार श्री. कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी नायब तहसीलदार रत्नाकर वसईकर, निवडणूक शाखेचे कर्मचारी, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.