भुसावळ । दीनदयाळ अंत्योदय योजना, जिल्हा कौशल्य विकास व राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियान तसेच नगरपालिकेच्या वतीने श्रीकृष्णचंद्र सभागृहात शनिवार 18 रोजी सकाळी 10 वाजेपासून भव्य रोजगार मेळावा घेण्यात आला. यामध्ये राज्यभरातील नामांकित कंपन्यांचे 13 स्टॉल लावण्यात आले होते. मेळाव्यात 946 रिक्त जागांसाठी कंपन्यांच्या प्रतिनिधींनी नोंदणी केलेल्या 624 बेरोजगारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या, यामध्ये 477 जणांची निवड करण्यात आली. त्यापैकी 191 उमेदवारांची जागेवरच नियुक्ती करण्यात आली. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी मंचावर आयोजक म्हणून मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर, गटनेता हाजी मुन्ना तेली, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर, राजेंद्र आवटे, जिल्हा विकास अधिकारी अरुण खैरनार उपस्थित होते. सुत्रसंचालन पल्लवी वक्ते यांनी केले. तर प्रास्तविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी शशिकला ठोंबरे यांनी केले. यांना व्यवस्थापक विलास देशपांडे, कम्युनिटी आयोजक अलका शिरसाठ यांनी सहकार्य केले.
योजनांचा योग्य फायदा घ्या
केंद्र व राज्य सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न केला आहे. योजना अनेक येतात मात्र त्याचा केवळ लाभ लाटण्याच्या कुविचाराने या योजना बारगळतात त्यांचा खरा हेतू यशस्वी होऊ शकत नाही, त्यामुळे बँकांनी अशा व्यक्तीगत योजनांना बंद केले. सुवर्ण जयंती योजनेत देखील असे प्रकार झाले असल्याचे मुख्याधिकारी बाविस्कर यांनी सांगितले.
कौशल्य कारणी लावा
अनेकांनी कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यामुळे याआधी तरुणांचे कौशल्य विकसीत होण्याची आवश्यकता असून यानंतर पुढील आर्थिक सहाय्यक करावे या हेतून दीनदयाळ अंत्योदय योजना राबविली जात आहे. तरुणांनी रोजगाराच्या संधी मिळाल्यानंतर आपण कोणत्याही संस्थेत कामगार म्हणून काम करताना आपले काम चोख करा, संस्थेची भरभराट होण्यासाठी आपले कौशल्य कारणी लावा, नोकरी कोणतीही करा मात्र पुर्ण मनोभावे काम करा, नविन शिकण्याचा प्रयत्न करा यामुळेच आपले भविष्य उज्वल होणार असा सल्ला देखील मुख्याधिकारी बाविस्कर यांनी उपस्थित सुशिक्षीत बेरोजगार युवक- युवतींना दिला.
जिद्द बागळून ध्येय गाठा
तरुणांनी आपला वेळ व्यर्थ वाया न घालता तो योग्य कामी लावणे गरजेचे आहे. त्यामुळे अशा रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून होतकरु युवकांनी मुलाखती देऊन संधीचे सोने करा, असे आवाहन उपनगराध्यक्ष युवराज लोणारी यांनी केले. ते म्हणाले की, कोणतेही काम कमी लेखू नका संपुर्ण जिद्द आणि चिकाटीने काम करा, यातूनच लहानात लहान कामातून आपण मोठा टप्पा गाठू शकतो तसेच घर सोडून जाण्याची तयारी देखील तरुणांनी ठेवावी असे
मार्गदर्शन केले.