पुणे : राज्यात गुरुवारी पावसाचा जोर कमीच होता. कोकण, घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद करण्यात आली. मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी बरसल्या. मुंबईत थांबून-थांबून हलक्या सरी पडल्या. तर विदर्भात तुरळक भागांत रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. मराठवाड्यात पावसाची नोंदच झाली नाही. दरम्यान, येत्या 48 तासात उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
सध्या उत्तर-पूर्व मध्यप्रदेश राज्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या 24 ते 48 तासांत त्याची तीव्रता आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याची तीव्रता वाढल्यास व ठळक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यास उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्र, मुंबई व कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असेही हवामान विभागाने नमूद केले.