48,000 stolen from house in Rawer : Wife Suspects Husband Of Theft रावेर : शहरातील आसार बर्डी परीसरातील एका घरातील कपाटातील लॉकर तोडून सोने-चांदीच्या दागिण्यांसह रोकड मिळून 48 हजारांचा ऐवज चोरीला गेला. ही घटना रविवारी घडली. या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पतीने चोरी केल्याचा पत्नीला संशय
शहरातील आसरा बर्डी भागातील प्रमिला विकास सवर्णे यांच्या घरातील कपाटाचे लॉकर तोडून 30 हजार रुपये किंमतीचे आठ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या गहू मण्यांची पोत, आठ हजार रुपये किंमतीचे 40 भार चांदीचे कडे तसेच दहा हजारांची रोकड मिळून 48 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. याबाबत प्रमिला सवर्णे यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पत्नीने हे दागिणे पतीने चोरल्याचा संशय व्यक्त केल्यानंतर त्यास पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सहायक फौजदार इस्माईल शेख करीत आहे.