480 गावांत ‘एक गाव एक गणपती‘!

0

पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून पुणे ग्रामीण पोलिसांच्यावतीने करण्यात येत असलेल्या मोहिमेला अखेर दिलासादायक यश आले आहे. जिल्ह्यातील 480 गावांत ‘एक गाव एक गणपती’ बसणार असल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक मोहमम्द सुवेझ हक यांनी दिली. जिल्ह्यातील सुमारे 97 हजार घरांत गणरायाचे आगमन होत असल्याचेही हक म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात शांतता व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणरायाच्या आगमनासोबत पोलिस दलावरील ताणही चांगलाच वाढला आहे.

गावागावांतील एकोपा वाढविणार!
एक गाव एक गणपती या मोहिमेची पुणे ग्रामीण पोलिसांनी गेल्या तीन महिन्यांपासून तयारी चालवली होती. त्यानुसार प्रत्येक गावात एकच गणपती बसेल, आणि कायदा व सुव्यवस्था सुरुळीत राहील. आणि, हा गणेशोत्सव निर्विघ्न पार पडेल, अशी पोलिसांना अपेक्षा होती. पोलिसांच्या या मोहिमेला जिल्ह्यातील 480 गावांनी सकारात्मक प्रतिसाद देत, या गावात आता एकच गणपती बसणार आहे. संपूर्ण गाव एकाच गणेशोत्सवाच्या सोहळ्यात सहभागी होणार असल्याने गावातील एकोपाही वृद्धिंगत होईल, असेही सुवेझ हक म्हणाले. राज्यात सरासरी 3900 गणेश मंडळे आहेत. त्या तुलनेत जिल्ह्यातील गणेश मंडळांची संख्या कमी आहे. जिल्ह्यातील 97 हजार घरांत गणरायांचे आगमन होणार आहे. एक गाव एक गणपती या मोहिमेमुळे गावातील एकोपा वृद्धिंगत होतो. गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलिसांवरील ताणही कमी होतो, असेही हक म्हणाले.

बंदोबस्तासाठी अतिरिक्त फौजफाटा
ईद-उल-झुहा व गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अतिरिक्त बंदोबस्तकामी राज्य राखीव पोलिस दलाचे जवानही बोलाविण्यात आलेले आहेत. या शिवाय, गृहरक्षा दलाच्या जवानांचीही मदत बंदोबस्तासाठी घेण्यात आली आहे, अशी माहितीही पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनी दिली. पोलिस रेकॉर्डवर असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचेही ते म्हणाले. गणेशोत्सवाच्या काळात ज्यांनी शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता, अशा सराईत गुन्हेगारांवरही नजर ठेवली जात असून, त्यांच्यापैकी काही कुख्यात गुंडांच्या तडिपारीसाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत. संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदीही हाती घेतल्याचे हक म्हणालेत.